नाशिक : यंदा कारागिरांवरील ‘विघ्न’ होणार दूर; मखर निर्मितीतून रोजगार

गणेशमूर्ती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

कोविड-१९ मुळे गेल्या दोन वर्षांपासून ‘विघ्न’ आलेल्या मूर्ती कारागिरांसह लायटिंग, बॅण्डवाले, जिंवत देखावा सादर करणारे कलाकार तसेच मखर निर्मिती करणाऱ्या कारागिरांसाठी यंदाचा गणेशोत्सव ‘विघ्न’ दूर करणारा ठरणार आहे. सध्या शहर व परिसरातील या कारागिरांकडे प्रचंड काम असून, पुढच्या काही दिवसांमध्ये ते पूर्ण करण्याचे त्यांच्यासमोर आव्हान आहे. यातून त्यांना उत्पन्न चांगले मिळणार असल्याने, गणेशोत्सवाबरोबरच कारागिरांचेही आनंदीपर्व सुरू होणार आहे.

अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाचा सध्या सर्वत्र उत्साह दिसून येत आहे. बाप्पाच्या आगमनाची जल्लोषात तयारी केली जात असून, यंदाचा उत्सव दणक्यात साजरा करण्यासाठी गणेशभक्त सज्ज झाले आहेत. यंदाच्या गणेशोत्सवाचे वैशिष्ट्ये म्हणजे निर्बंधमुक्त हा उत्सव साजरा करता येणार आहे. अशात यंदाचा हा उत्सव अनेकांच्या हाताला रोजगार देणारा ठरणार असल्याने, सर्वत्र आनंददायी वातावरण दिसून येत आहे. सार्वजनिक गणेशोत्सवात कलाकार, मंडप डेकोरेशन, नेपथ्यकार, वाद्यवृंद, हॉटेल, मिठाई, आचाऱ्यांना मोठा रोजगार मिळाला आहे. त्यामुळे उत्सव काळात अवघ्या १० दिवसांतच कोट्यवधी रुपयांची उलाढाल होणार आहे. शहरात भव्य मूर्तीसाठी, सेट उभारणीसाठी मोठे मंडप उभारण्याचे काम सुरू आहे. मंडपासाठी खर्च १० हजारांपासून एक लाख रुपये इतका दर डेकोरेशन व्यावसायिकांकडून आकारला जात आहे. तसेच मंडप व्यावसायिकांकडून काम करणाऱ्या कारागिरांनाही चांगली राेजंदारी दिली जात आहे. पारंपरिक वाद्यांमध्ये ढोलपथक, झांजपथक, बँड, बेंजो, हलगी ताशा, लेजिम या वाद्यपथकांनाही मोठी मागणी आहे. विसर्जन मिरवणुकीत १५ हजार ते एक लाख रुपयांपर्यंतची बिदागी या पथकांना दिली जाणार आहे. अनेक कलाकारांना उत्सवातून रोजगार मिळत आहे. जिवंत देखावे सादर करणाऱ्या मंडळाकडून संवादलेखन, नेपथ्यकार, डबिंग, अभिनय करणारे कलाकार, संगीतकार, प्रकाशयोजना, ध्वनिमुद्रण करणाऱ्या कलाकारांसाठी या माध्यमातून मोठा रोजगार मिळणार आहे. या कलाकारांना पाच ते १० हजारांपर्यंत मानधन दिले जाते. त्याचबरोबर उत्सव काळात सर्वांत जास्त रोजगार खाद्यपदार्थ विक्रेत्यांना होतो. १० दिवस नागरिकांची मोठी वर्दळ असल्याने, हॉटेलमध्ये ग्राहकांची रेलचेल वाढते. त्यामुळे नेहमीच्या तुलनेत या काळात २० ते ३० टक्के ग्राहक वाढलेले असतात. त्याव्यतिरिक्त खेळण्याची दुकाने, इमिटेशन ज्वेलरी विक्रेत्यांचा व्यवसायही चांगला होतो. एकूणच यंदाचा गणेशोत्सव हा सर्वांसाठीच आनंददायी पर्व घेऊन येणारा ठरणार आहे.

मिठाईच्या दुकानात उलाढाल : यंदा मिठाई विक्रीतून मोठी उलाढाल होणार आहे. खव्याचे मोदक, बुंदीसह विविध मिठाईंना या काळात मोठी मागणी असते. अनेक मंडळांकडून महाप्रसादाचेही आयोजन केले जाते. अशात आचारी व वाढप्यांना रोजगाराची मोठी संधी मिळणार आहे. सध्या बहुतांश आचाऱ्यांकडे मोठ्या ऑडर्स आहेत.

मखरनिर्मितीतून महिलांना रोजगार : मखरनिर्मितीतून महिलांना मोठा रोजगार मिळणार आहे. सध्या शहरातील बहुतांश महिलांच्या बचतगटांच्या माध्यमातून मखरनिर्मिती करण्याचे काम केले जात आहे. काही महिलांच्या बचत गटांनी अत्यंत आकर्षक असे मखर बाजारातदेखील आणले आहेत. यातून महिला बचतगटांना चांगले उत्पन्न मिळणार आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : यंदा कारागिरांवरील ‘विघ्न’ होणार दूर; मखर निर्मितीतून रोजगार appeared first on पुढारी.