नाशिक : यंदा शहरातील 478 गणेश मंडळांना परवानगी, तब्बल 487 मंडळांचे अर्ज नाकारले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापालिकेच्या कर आकारणी विभागाने गणेशोत्सवासाठी शहरातील 478 सार्वजनिक गणेश मंडळांना परवानगी दिली आहे. परवानगीसाठी मंगळवारी (दि.30) शेवटची मुदत होती. या मुदतीनंतरही 31 मंडळांचे अर्ज तांत्रिक कारणांमुळे प्रलंबित राहिले. तर विविध कारणांमुळे तब्बल 487 मंडळांचे अर्ज नाकारण्यात आले.

राज्य शासनाने मंडप धोरणांतर्गत सार्वजनिक ठिकाणी गणेशोत्सव साजरा करताना मंडप उभारणी करताना महापालिकेची रीतसर परवानगी घेणे बंधनकारक केले आहे. कोरोनामुळे गेली दोन वर्षे गणेशोत्सव साजरा करताना अनेक निर्बंध लादण्यात आले होते. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा झाला नाही.

आता कोरोना महामारीचा प्रादुर्भाव कमी झाल्याने दोन वर्षांनंतर यंदा प्रथमच निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन राज्य शासनाने केले आहे. परंतु, उत्सव साजरा करताना व त्यासाठी लागणारे मंडप व इतर गोष्टींसाठी मात्र नियमावली आखून देण्यात आली आहे. सार्वजनिक गणेश मंडळांना महापालिकेसह पोलिस, वाहतूक शाखा, अग्निशमन या विभागांच्या परवानगीसाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ऑनलाइन प्रणालीद्वारे अर्ज सादर केल्यानंतर कागदपत्रांची पडताळणी करून तीन दिवसांत परवानगी देण्याचा कालावधी निश्चित करण्यात आला होता. मंगळवारी (दि.30) परवानगीसाठी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवसापर्यंत महापालिकेकडे 996 मंडळांनी अर्ज दाखल केले होते. पोलिस, अग्निशमन, वाहतूक शाखेचा ना हरकत दाखला नसणे या बाबींमुळे 487 अर्ज नाकारण्यात आले. तर, 478 मंडळांना परवानगी देण्यात आली.

नाशिकरोडला यंदा मंडळांची संख्या कमी
मनपाकडून परवानगी मिळालेल्या 478 मंडळांपैकी पंचवटी विभागात सर्वाधिक 101 मंडळांची संख्या आहे. पंचवटी विभागातून 194 अर्ज प्राप्त झाले. पूर्व विभागातून 188 मंडळांचे अर्ज प्राप्त झाले. पैकी 65 मंडळांना परवानगी दिली आहे. नाशिक पश्चिम विभागातील 127 पैकी 66, सिडको विभागातील 235 पैकी 91, सातपूरमधील 156 पैकी, 91 तर नाशिकरोड विभागातील 96 पैकी
64 मंडळांना परवानगी दिली.

हेही वाचा :

The post नाशिक : यंदा शहरातील 478 गणेश मंडळांना परवानगी, तब्बल 487 मंडळांचे अर्ज नाकारले appeared first on पुढारी.