नाशिक : यंदा हंगामापूर्वीच द्राक्ष खायला मिळणार

द्राक्ष

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
दरवर्षी फेब्रुवारी महिन्यापासून सुरू होणारा द्राक्षांचा हंगाम यंदा लवकरच सुरू झाला आहे. मात्र, आता आणखी ऊन आणि हवामानात स्थैर्य आल्यास द्राक्षांमध्ये साखर अधिक प्रमाणात उतरून आणखी गोड द्राक्षे खायला मिळणार आहेत. शहरात आताच गोड, रसाळ, काळी आणि पांढरी द्राक्षे उपलब्ध झाल्याने ग्राहकवर्गाचे लक्ष आकर्षिले जात आहे. तसेच निर्यातीसाठीदेखील द्राक्षांची छाटणी सुरू झालेली दिसून येत आहे.

गेल्या दोन-तीन वर्षांत खराब हवामान बिघाडाचा आर्थिक फटका द्राक्ष पिकाला बसला होता. बेमोसमी पाऊस, अतिप्रमाणात गारवा, बोचरी थंडी यामुळे द्राक्षबागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या वर्षी तरी बळीराजाला आपल्या द्राक्षांचा चांगला मोबदला मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. साधारणतः फेब्रुवारी ते मे असा द्राक्षांचा हंगाम असतो. मात्र, अलीकडच्या काळात हंगामपूर्व द्राक्षांची आवकही होत आहे. येत्या काही दिवसांत आवक वाढण्याची शक्यता व्यापार्‍यांकडून वर्तविण्यात येत आहे. यंदाचा हंगाम तसा स्थिर असण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. जर तसे झाले तर जिल्हाभरातील द्राक्षबागायतदार यांच्या द्राक्षमण्यांना गोडवा प्राप्त होऊन आर्थिक आवकदेखील मोठ्या प्रमाणात येईल. बेमोसमी पाऊस आणि गारवा यांचे प्रमाण कमी असल्यासच हे शक्य होणार असल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले आहे. सध्या सुरू असलेल्या बाजारभावानुसार, काळ्या द्राक्षांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. यात शरद सीडसेल, काळी सोनाका, फ्लेम यांना 90 ते 110 रुपये किलो भाव आहे. तर पांढर्‍या द्राक्षांमध्ये सुपर सोनाका 40 ते 60 रुपये प्रतिकिलो, थॉमसन एक्स्पोर्ट क्वालिटी 80 ते 90 रुपये प्रतिकिलो असा सर्वसाधारण दर आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : यंदा हंगामापूर्वीच द्राक्ष खायला मिळणार appeared first on पुढारी.