नाशिक : ‘या’ गावाला अडीच वर्षांत लाभले तब्बल 18 ग्रामसेवक

Wardha

नाशिक (पिंपळगाव मोर) : नीलेश काळे
इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव मोर ग्रामपंचायतचे ग्रामसेवक अजबराव निकम यांनी ऑगस्ट 2020 मध्ये आजारपणाचे कारण देत 38 दिवसांची रजा मागितली. त्यानंतर आतापर्यंत वेळोवेळी 18 ग्रामसेवकांकडे अतिरिक्त पदभार सोपविण्याची किमया प्रशासनाने साधली आहे. ग्रामपंचायतीला 14 व 15 व्या वित्त आयोगाचा अडीच वर्षांपासूनचा दीड कोटींचा निधी पडून असून, नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत.

गावातील अंतर्गत राजकीय कलहाला बळी पडून गटविकास अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सातत्याने प्रभारी ग्रामसेवकांकडील पदभार काढण्याची भूमिका घेतली. मात्र, हा प्रश्न कायमस्वरूपी सोडविला नाही, अशी चर्चा रंगली आहे. गटविकास अधिकार्‍यांनीही दुसर्‍या ग्रामसेवकास अतिरिक्त पदभार देण्याचा निर्णय घेतला. गत अडीच वर्षांत तब्बल 18 ग्रामसेवक बदलले गेल्याने बँकांच्या खात्यातही सरपंच आणि ग्रामसेवकांचा ताळमेळच न बसल्याने विकासकामे गावात ठप्प झाली आहेत.

पुढील वर्षात मिळणार पूर्णवेळ ग्रामसेवक
जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी याबाबत सांगितले की, दरम्यानच्या काळात रत्नाागिरी येथून आंतरजिल्हा बदली ग्रामसेवक पिंपळगाव मोर ग्रामपंचायतीत नियुक्ती दिली होती. मात्र, रत्नागिरी जिल्हा परिषदेने त्यांना अद्याप कार्यमुक्त केलेले नाही. रत्नागिरी जिल्हा परिषदेशी पत्रव्यवहार केला असून, साधारणपणे एप्रिलमध्ये पिंपळगाव मोर ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक म्हणून नियुक्त होण्याची शक्यता आहे.

प्रशासनाचा निर्णय ठरतो कुचकामी
ग्रामसेवक आल्यानंतर ग्रामपंचायतचे खाते असलेल्या बँकेत सरपंच व ग्रामसेवकाच्या सह्यांचे नमुने द्यावे लागतात. ही प्रक्रिया पूर्ण होण्याच्या दहा-पंधरा दिवसांमध्ये ग्रामसेवक वेगवेगळी कारणे देऊन पदभार सोडण्याची विनंती अधिकार्‍यांना करतात. ही विनंती मान्य केली जाते, या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित होत आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : 'या' गावाला अडीच वर्षांत लाभले तब्बल 18 ग्रामसेवक appeared first on पुढारी.