नाशिक : युरोपात कांदा निर्यातीसाठी प्रयत्न करणार – केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार

कांदा दर

नाशिक : पुढारी वृृत्तसेवा

नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतले जाते. हा कांदा विकत घेणारे आशियातील बांगलादेश, श्रीलंका तसेच पाकिस्तान हे आर्थिक विवंचनेेत अडकलेले आहेत. आता त्यांना कांदा विकत घेणे परवडणारे नाही. त्याचा परिणाम म्हणून देशातील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यांच्यासाठी मध्य आशिया तसेच युरोपमध्ये बाजारपेठ तयार कशी करता येईल, यासाठी प्रयत्नशील आहे, असे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सांगितले.

देशाच्या अर्थसंकल्पाबाबत माहिती देण्यासाठी भाजप शहर कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे, आ. राहुल ढिकले, आ. सीमा हिरे, लक्ष्मण सावजी, सुनील केदार आदी उपस्थित होते. ना. डॉ. पवार म्हणाल्या, नाशिक हा कांदा उत्पादक जिल्हा आहे. यंदा बाजारपेठेत कांद्याची मागणी वाढल्याने उत्पादन वाढले. मात्र, कांदा खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांना बाजारपेठ मिळाली नाही. त्यासाठी नाफेडने कांदा विकत घ्यावा. गेल्या वेळी कांदाप्रश्नी नाफेडकडे आपण नियमित पाठपुरावा केला होता. तेव्हा ३५० कोटी रुपयांचा कांदा सरकारने खरेदी केला होता. यावेळीही त्यांना कांदा खरेदी करण्याची विनंती करत आहोत. सध्या शेतकऱ्यांनी कांदा निर्यातीसाठी आशियाई देशांवर अवलंबून न राहता, युरोपात निर्यातीला प्राधान्य द्यावे. पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका यांसारख्या आर्थिक विवंचनेत असलेल्या आशियाई देशांत कांदा विकण्यापेक्षा आर्थिक सुस्थितीत असलेल्या युरोपीय देशांमध्ये कांदा निर्यात करावा, असेही ना. डॉ. पवार यांनी सांगितले.

अर्थसंकल्पाचे जोरदार कौतुक
यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या देशाच्या अर्थसंकल्पाबाबत माहिती देताना, यंदाचा अर्थसंकल्प हा अमृतकाल अर्थसंकल्प आहे. समृद्ध भारत या संकल्पनेतून अमृत महोत्सव साजरा करत असताना त्यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये आर्थिक विकास दर 7 टक्क्यांपर्यंत जाण्याचे अनुमान आहे. देशाची अर्थव्यवस्था सुस्थितीत राहावी यासाठी अनेक संकटांतून बाहेर येत एक दिशादर्शक अर्थसंकल्प यामध्ये दिला आहे.

कोविडच्या काळात देशामध्ये डिजिटल क्रांती झाली. युनिफाईड पेमेंट, डिजिटल पेमेंट या माध्यमातून देश डिजिटली जवळ आला आहे. त्यातून देशाचे सक्षमीकरण करण्यात आले आहे. दरम्यान, सध्या जी २० चे अध्यक्षपद आपल्या देशाकडे असल्याने त्याचा वापर करत आपण आपली भूमिका जगासमोर मांडत आहोत. 10व्या क्रमांकावर असलेली आपली अर्थव्यवस्था आता पाचव्या क्रमांकावर आलेली आहे, असेही ना. डॉ. आहेर यांनी सांगितले.

हायस्पीड रेल्वे धावणारच
नाशिक – पुणे हायस्पीड रेल्वेबाबत विचारले असता ना. डॉ. पवार यांनी, जमीन मूल्यांकन, हस्तांतरण याचे कारण दिले. मात्र, हा प्रकल्प होईलच, यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री यांनी ग्रीन सिग्नल दिला आहे. त्यामुळे हा प्रकल्प होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा:

The post नाशिक : युरोपात कांदा निर्यातीसाठी प्रयत्न करणार - केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार appeared first on पुढारी.