Site icon

नाशिक : युवकाच्या हत्येप्रकरणी चौघांना जन्मठेप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

युवकाच्या हत्येप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश व्ही. पी. देसाई यांनी मंगळवारी (दि.९) चौघांना जन्मठेप आणि प्रत्येकी १० हजार दंडाची शिक्षा सुनावली. गणेश अशोक उघडे (३०), जितेश उर्फ बंडू संतोष मुर्तडक (३७), संतोष विजय पगारे (३६), संतोष अशोक उघडे (३२) अशी शिक्षा झालेल्या संशयितांची नावे आहेत. तर या प्रकरणात संशयित सागर विठ्ठल जाधव आणि जयेश उर्फ जया हिरामण दिवे यांची न्यायालयाने मुक्तता केली.

पेठरोड परिसरातील नवनाथनगर येथे १८ मे २०१७ रोजी जुन्या भांडणाची कुरापत काढून किरण राहूल निकम या युवकावर जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने संशयितांनी धारदार शस्त्राने वार केले होते. खोलवर घाव बसल्याने निकमचा जागेवर मृत्यू झाला होता. याप्रकरणी मयताचा मावस भाऊ नितीन दिनकर पगारे (३५, रा. म्हसरूळ, राजवाडा) यांच्या फिर्यादीवरून पंचवटी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक के. डी. वाघ यांनी तपासाची चक्रे फिरवून संशयितांविरोधात सबळ पुरावे गोळा केले.

किरण निकम हत्याकांडाची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. पी. देसाई यांच्यासमोर झाली. परिस्थितीजन्य पुराव्यासह फिर्यादी, साक्षीदार, पंच यांनी दिलेल्या साक्ष ग्राह्य धरून न्यायालयाने गणेश उघडे, बंडू मुर्तडक, संतोष पगारे, संतोष उघडे यांना जन्मठेप व प्रत्येकी १० हजारांचा दंड, दंड न भरल्यास ६ महिने साधा कारावासाची शिक्षा सुनावली. सहायक सरकारी अभियोक्ता म्हणून ॲड. सुधीर कोतवाल यांनी काम पाहिले. पोलीस हवालदार एम. एम. पिंगळे, व एस. टी. बहिरम यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला.

हेही वाचा :

The post नाशिक : युवकाच्या हत्येप्रकरणी चौघांना जन्मठेप appeared first on पुढारी.

Exit mobile version