नाशिक : यूपीआय पेमेंट फसल्यावर कम्प्लेंट कुठे कराल?

UPI Transaction

नाशिक : दीपिका वाघ

डिजिइन्फो

कोविड काळात पैशांची देवाणघेवाण करताना पैशांना स्पर्श करायची भीती लोकांमध्ये होती. त्यामुळे लॉकडाउनच्या काळात डिजिटल व्यवहारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले. आत्ताच्या घडीला सर्वसामान्य माणूस पाच, दहा, हजारो रुपयांसाठी यूपीआय पेमेंटचा वापर करतो. क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर लगेचच व्यवहार होत असल्याने आता फार पैसे जवळ बाळगण्याची गरज पडत नाही. घराबाहेर पडताना फक्त मोबाइल घेऊन बाहेर पडले तरी चालते. यूपीआय पेमेंटसाठी फोन पे, गुगल पे, पेटीएम, अ‍ॅमेझॉन पे यांसारख्या अ‍ॅपचा उपयोग केला जातो. पण कधी तुमच्याकडून चुकीच्या नंबरवर अनावधानाने पैसे दुसर्‍या व्यक्तीला ट्रान्स्फर झाले किंवा खात्यावरून पैसे कट झाले पण समोरच्या व्यक्तीच्या खात्यावर जमाच झाले नाही, तर खात्यावरून कट झालेले पैसे रिफंड कसे होतात?

एनपीसीआय (नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) ही सरकारची यूपीआय पेमेंटसाठीची अधिकृत वेबसाइट आहे. या वेबसाइटवर गेल्यावर ‘गेट इन टच’ पर्यायावर क्लिक करा. नंतर यूपीआय कम्प्लेंट पर्यायावर क्लिक करून ट्रॅन्झेक्शन पर्याय निवडा. त्याठिकाणी एक फॉर्म मिळेल. त्यामध्ये बेसिक माहिती व ट्रॅन्झेक्शनची माहिती टाकावी लागेल. तुम्ही केलेले ट्रॅन्झेक्शन पर्सन टू पर्सन आहे की पर्सन टू मर्चंट त्यापैकी एक पर्याय निवडा. ट्रॅन्झेक्शन आयडी, तक्रारीचा प्रकार निवडून, बँकेचे नाव, व्हीपीए (व्हर्च्युअल पेमेंट ॲड्रेस), मेल आयडी, मोबाइल नंबर टाकून फॉर्म सबमिट करा. तक्रार रजिस्टर झाल्याचा मेसेज तुम्हाला येईल. त्याचबरोबर ज्या अ‍ॅप्लिकेशनवरून ट्रॅन्झेक्शन केले, त्याबाबत कस्टमर केअरला कॉल करता येतो. तसेच तक्रार सेक्शनमध्ये जाऊन तक्राराची नोंद करता येते. एनपीसीएल दोन्ही बँकांशी बोलून पैसे सात दिवसांच्या आत तुमच्या अकाउंटवर जमा करते. रक्कम जर मोठी असेल, तर बँकेत तक्रार नोंदवता येते.

The post नाशिक : यूपीआय पेमेंट फसल्यावर कम्प्लेंट कुठे कराल? appeared first on पुढारी.