नाशिक : येळकोट येळकोट जय मल्हार! चंपाषष्ठी उत्सवास प्रारंभ

चंपाषष्ठी उत्सवास प्रारंभ,www.pudhari.news

नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा

श्री खंडोबा महाराजांच्या चंपाषष्ठी उत्सवास नाशिक जिल्ह्यातील वणी येथे श्री. खंडेराव महाराज, म्हाळसा देवी, सप्तशृंगी मातेच्या घटस्थापनेने उत्साहात प्रारंभ झाला. मंगळवार (दि. २९) पर्यंत चालणाऱ्या या उत्सवात किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबरच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून चंपाषष्ठीच्या दिवशी बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम संपन्न होणार आहे..

वणी येथील श्रीक्षेत्र खंडेराव महाराज मंदिरात गुरुवार पासून चंपाषष्ठी उत्सवास सुरुवात झाली. यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदीर, प्रवेशद्वार व परीसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या उत्सव काळात दररोज सकाळी ५ ते ६ वाजेपर्यंत श्री. मल्हार विजय ग्रंथाचे पारायण, सकाळी सहा वाजता आरती, सांयकाळी सहा वाजता सांज आरती संपन्न होणार आहे. तसेच चार दिवसीय किर्तन महोत्सवाचे आयोजन योगेश महाराज जाधव संगमनेर वणी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.

चंपाषष्ठीच्या यात्रोत्सवा निमित्त मंगळवार (दि. २९) सकाळी सहा वाजता श्री. मल्हार विजय ग्रंथ पारायणाची सांगता होणार असून सकाळी सात वाजता चंदनपूरी येथून कावडीने आणलेल्या जलाने श्री. खंडेराव महाराज, म्हाळसा देवी, सप्तशृंगी माता मूर्तीचा जलाभिषेक व पंचामृत महापूजा संपन्न होईल. त्याच दिवशी दुपारी १२ वाजता खंडेराव म्हाळसा-बानाई यांचा विवाह सोहळा संपन्न होणार आहे. यानंतर भाविक वांग्याचे भरीत व भाकरीचा नैवद्य दाखवतील. यासाठी मंदीर व्यवस्थापनाकडून स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे. सायंकाळी पाच वाजता श्री. मल्हारी मार्तंड रथाची तसेच मंदीराचे पुजारी व बारागाड्या ओढणारे पुंजाराम पानसरे यांची गावातून मिरवणूक काढण्यात येईल. मिरवणूकीची सांगता झाल्यानंतर मंदिर प्रागंणात बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम संपन्न होईल. यानंतर श्री खंडेराव महाराज मंदिरात महाआरती सपंन्न होईल. रात्री जागरण गोंधळाचा कार्यक्रम होणार असून पहाटे लंगर तोडुन यात्रेची सांगता होईल.

हेही वाचा :

The post नाशिक : येळकोट येळकोट जय मल्हार! चंपाषष्ठी उत्सवास प्रारंभ appeared first on पुढारी.