नाशिक : येवल्याच्या कातरणी पंचक्रोशीत हाहाकार; हंगाम वाया गेल्याने बळीराजा संकटात

yeola www.pudhari.news

नाशिक (येवला) : पुढारी वृत्तसेवा
येवला तालुक्यातील उत्तर भागात गत पन्नास वर्षांत झाला नाही इतका पाऊस यंदा झाला असून पावसाने सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. रविवारी तालुक्याच्या उत्तर भागातील कातरणी, विखरणी, विसापूर, आडगाव रेपाळ, मुरमी, गुजरखेडेसह परिसरातील गावात धुवाधार पाऊस कोसळला. दुपारी 3 च्या सुमारास सुरू झालेला पाऊस रात्री 9 पर्यंत अक्षरशः धुडगूस घालत होता. त्यानंतर कमी-अधिक प्रमाणात रात्रभर पाऊस कोसळतच होता.

कातरणी येथे ढगफुटीसदृश पाऊस झाला असून, येथील अनेक शेतकर्‍यांची उभी पिके वाहून गेली आहेत. कातरणी-आडगाव तसेच रेपाळ-पाटोदा रस्ता या पावसाने वाहून गेला आहे. सहा तास सुरू असलेल्या या पावसाने अनेक शेतकर्‍यांच्या जमिनी मुरमासकट वाहून गेल्याने खडक उघडा पडला आहे. त्यामुळे आता पुढील पीक उभे करणेही शक्य होणार नाही. पाटोदा, कानडी, विखरणी, आडगाव, रेपाळ, लौकी, शिरसगाव, सोमठाणदेशसह पाटोदा परिसरातील गावांमध्ये मुसळधार पावसाने शेती नष्ट झाली. कांद्याची लागवड करण्यासाठी टाकलेली रोपे जमिनीतील बुरशी व सततच्या पावसामुळे सडली आहेत.कांद्याच्या उळ्याचा भाव 3 लाख 50 हजार ते 4 लाख रुपये प्रतिक्विंटल असून, फक्त कांदा रोपांचा विचार केल्यास खराब हवामानामुळे शेतकर्‍यांना कोट्यवधी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले. गेल्या 15 दिवसांपासूनच्या सततच्या पावसामुळे शेतातील 70 टक्के पिके पिवळी पडली आहेत. कांद्याच्या रोपांची अवस्था अत्यंत बिकट असून वाफेच्या वाफे पिवळे पडत आहेत. अनेक ठिकाणी कांदा, मका, द्राक्ष, टोमॅटोच्या शेतात पाणी साचले आहे. आजही कातरणी भागात ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने झाल्याने पिके पाण्याखालीच होती. येवला-नाशिक मार्गावरील देशमाने येथील गोई नदीला पूर आल्याने या मार्गावर काही काळ वाहतूक एकेरी मार्गाने सुरू होती. अनेक ठिकाणी घरे पडण्याच्या घटनाही घडल्या आहेत. मागील 15 दिवसांपासून सतत कोसळत असलेल्या पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. कातरणी, आडगाव, रेपाळ मुरमी परिसरातील हजारांवर हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. नव्याने आलेल्या या संकटाने होत्याचे नव्हते झाले असून, सरसकट पंचनामे करून दिलासा देण्याची मागणी शेतकरी करत आहेत.

हेही वाचा:

The post नाशिक : येवल्याच्या कातरणी पंचक्रोशीत हाहाकार; हंगाम वाया गेल्याने बळीराजा संकटात appeared first on पुढारी.