नाशिक : रमजानसाठी गजबजले इफ्तार बाजार

रमजान ईद बाजार,www.pudhari.news

जुने नाशिक : पुढारी वृत्तसेवा

गुरुवारी (दि.२३) चंद्रदर्शन घडल्याने पवित्र रमजान पर्वाची सुरुवात झाली. शुक्रवार (दि.२४) रोजी पहाटे सेहरी खाऊन रोजा ठेवण्यास सुरुवात करण्यात आली. याच दिवशी रोजा (उपवास) सोडण्यासाठी इफ्तारकरिता विविध बाजारे थाटली होती. सध्या तीन रोजे पूर्ण झाले असताना इफ्तारचे बाजार गजबजले असून, संध्याकाळच्या वेळेस रोजादारांची गर्दी दिसून येत आहे.

मुस्लिम धर्मीय रमजान महिन्याची वर्षभर आतूरतेने वाट पाहतात, कारण धार्मिक मान्यतेनुसार रमजानचे खूप महत्त्व आहे. या महिन्यात रोजा (उपवास)पाठोपाठ जास्तीत जास्त वेळ नमाज पठण व पवित्र कुराण पठण करावे, अशी धार्मिक शिकवण आहे. तसेच मोठ्या प्रमाणात दानधर्म करण्याची परंपरा आहे. 

धार्मिक मान्यतेनुसार इफ्तारसाठी सुरुवातीला खजूर खाण्यास सर्वांत जास्त पसंती आहे. खजूर उपलब्ध नसल्यास पाणी, नमक किंवा कोणतेही खाद्यपदार्थ खाऊन इफ्तार केला जाऊ शकतो. इफ्तारसाठी बाजारात विविध खाद्यपदार्थांची आवक वाढली आहे. फळांमध्ये पपई, केळी, टरबूज, सफरचंद, खरबूज, अननस, आम तसेच खजूर, मिठाया, पालक भजी, मूग भजी, चिकन टिक्का, शाही रोल, शमी कबाब, सिख पराठा, खमण ढोकळा, फाफडा, फालुदा, मालपुवा इत्यादी पदार्थांची मागणी वाढली आहे.

सहेरी व इफ्तारचे वेळापत्रक

रमजान महिन्यात पहाटे थोडेसे खाऊन रोजा ठेवला जातो. याला सेहरा म्हणतात. यावर्षी नाशिक शहरात पहिल्या रोजाकरिता सेहरीची वेळ पाच वाजून अठरा मिनिटे, तर तिसाव्या अर्थात शेवटच्या रोजाकरिता चार वाजून बावन्न मिनिटे अशी राहणार आहे. सायंकाळी खजूर खाऊन दिवसभराचा रोजा सोडला जातो, याला इफ्तार म्हणतात. यावर्षी नाशिक शहरात पहिल्या रोजाकरिता इफ्तारची वेळ सहा वाजून पन्नास मिनिटे, तर तिसाव्या अर्थात शेवटच्या रोजाकरिता सहा वाजून अठ्ठावन्न मिनिटे अशी राहणार आहे. सूर्योदय व सूर्यास्त यावरून सेहरी व इफ्तारचे वेळापत्रक काढले जाते. यामुळे सेहरी व इफ्तार यांच्या वेळात रोज किंवा एक दोन दिवसांच्या अंतराने बदल होतो.

हेही वाचा :

The post नाशिक : रमजानसाठी गजबजले इफ्तार बाजार appeared first on पुढारी.