नाशिक : रस्त्याअभावी हेदपाडा येथील महिलेला न्यावे लागले डोलीतून; प्रसूतीसाठी गर्भवतीची फरपट

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील तोरंगणच्या हेदपाडा आणि मेटकावरा या वस्त्यांवर राहणाऱ्या ग्रामस्थांना रस्त्याअभावी अनेक असुविधांना सामोरे जावे लागत आहे. शुक्रवारी (दि. 12) हेदपाडा येथील गर्भवतीस प्रसूती कळा सुरू झाल्याने तिला अंबोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यासाठी डोली करून न्यावे लागले. अंबोली प्राथमिक आरोग्य केंद्र येथून साधारणत: 11 किमी अंतरावर आहे. मात्र, मुख्य रस्त्यावर जाण्यासाठी तीन किमी अंतर डोलीने घेऊन जात तिथून पुढे वाहनाने 8 किमी अंतर वाहनाने प्रवास झाला. रुग्णालयात पोहचताच या महिलेची प्रसूती झाली. तिला कन्यारत्न झाले. रुग्णालयात नेण्यास उशीर झाला असता, तर रस्त्यातच प्रसूती होण्याची वेळ आली असती.

हेदपाडा रस्त्याबाबत येथील ग्रामस्थांनी कायम मागणी केली आहे. मात्र, त्याकडे लक्ष दिले जात नाही. यापूर्वीदेखील वेळीच उपचार न मिळाल्याने काही दुर्दैवी घटना घडलेल्या आहेत. पावसाळ्याचे दिवस असल्याने या तीन किमी रस्त्याने दुचाकीदेखील चालविता येत नाही. वयोवृद्ध, दिव्यांग यांना पायपीट करावी लागते. शासनाकडे वारंवार मागणी करूनदेखील हा रस्ता झालेला नाही. रस्ता मंजूर असल्याचे सांगण्यात येते मग काम का सुरू होत नाही, असा संतप्त सवाल येथील ग्रामस्थ उपस्थित केला आहे.

हेदपाडा रस्ता मंजूर झालेला आहे. प्रशासकीय मान्यता मिळताच काम सुरू केले जाणार आहे. – श्रीकिसन खताळे, गटविकास अधिकारी, त्र्यंबक पंचायत समिती.

हेही वाचा:

The post नाशिक : रस्त्याअभावी हेदपाडा येथील महिलेला न्यावे लागले डोलीतून; प्रसूतीसाठी गर्भवतीची फरपट appeared first on पुढारी.