नाशिक : रागाच्या भरात वृद्धेची विहिरीत उडी मारून आत्महत्या

आत्महत्या

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

घरात किरकोळ भांडण झाल्याने संतप्त झालेल्या वयोवृद्ध महिलेने रागाच्या भरात जवळच असलेल्या विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. ही घटना पळसे कारखाना रोडवरील गायखे मळा परिसरात घडली.

अंजनाबाई शिवाजी गायखे असे आत्महत्या केलेल्या आजीचे नाव आहे. त्या पळसे येथील कारखाना रोडवर असलेल्या गायखे मळ्यात राहतात. अंजनाबाई यांचे घरात कुटुंबीयांसमवेत किरकोळ भांडण झाले. या भांडणाचा राग येऊन त्या घराबाहेर पडल्या. त्यानंतर रागाच्या भरात त्यांनी जवळच असलेल्या विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. या घटनेनंतर त्यांच्या नातेवाइकांनी आजूबाजूला शोध घेतल्यानंतर अंजनाबाई यांची चप्पल विहिरीच्या कडेला आढळल्याने त्यांनी स्थानिक पोलिसपाटलांशी संपर्क साधून त्यांच्या मदतीने विहिरीत गळ टाकून शोध घेतला असता अंजनाबाईंचा मृतदेह गळाला लागला. दरम्यान, या घटनेप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात विशाल विलास गायखे यांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक पवार करत आहेत.

हेही वाचा:

The post नाशिक : रागाच्या भरात वृद्धेची विहिरीत उडी मारून आत्महत्या appeared first on पुढारी.