नाशिक : रामशेज किल्ल्यावरील पर्यटन ठरतेय जीवघेणे

दिंडोरी : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेला व पर्यटकांचा नेहमी वावर असणार्‍या रामशेज किल्ल्यावरील पर्यटन धोकादायक ठरत आहे. नाशिक शहरापासून अवघ्या 14 किलोमीटरवर असणार्‍या रामशेज किल्ल्यावर गेल्या दोन वर्षांत झालेल्या विविध अपघातांत तीन ते चार जणांचा मृत्यू झाला आहे.

शनिवारी व रविवारी नाशिक शहरासह विविध भागातील पर्यटक सहकुटुंब येथे पर्यटनासाठी येतात. त्यात पावसाळी पर्यटनात पर्यटकांचा मोठा वावर असतो. येथे हुल्लडबाजी करणारे अधिक असतात. तसेच अनेक हौशी पर्यटक या किल्ल्यावर मद्यपानदेखील करतात. त्यामुळे या ठिकाणी महिलावर्गाच्या छेडछाडीचे अनेक प्रकारदेखील घडले आहेत. पावसाळ्यात या ठिकाणचे रस्ते मोठ्या प्रमाणात निसरडे होतात. तसेच किल्ल्यावर असणार्‍या तळ्यावर कुठल्याही प्रकारचे संरक्षक पाइप व कथडे नसल्याने छोटे- मोठे अपघात घडतात. तसेच किल्ल्याच्या कठड्यावर उभे राहून सेल्फी काढण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात होत असल्याने अपघात घडले आहेत. हा किल्ला वनविभागाच्या अंतर्गत असल्याने वनविभागाने या ठिकाणी कुठलीही नोंदणी चौकी उभारलेली नाही. तसेच शनिवारी व रविवारी पोलिस यंत्रणेचे कुठलेही संरक्षण नसते. किल्ल्यालगत असलेल्या आशेवाडी ग्रामपंचायतीकडून पर्यटनासाठी येणार्‍या पर्यटकांकडून शुल्क वसूल केले जाते. परंतु पर्यटकांसाठी कुठल्याही सोयीसुविधा दिल्या जात नाहीत. त्यामुळे रामशेज किल्ल्यावरील पर्यटन दिवसेंदिवस जीवघेणे ठरत असल्याचे पर्यटकांची म्हणणे आहे. याबाबत संबंधित यंत्रणेने योग्य दखल घेऊन भविष्यात अशा घटना होणार नाहीत, याची दक्षता घेणे गरजेचे आहे.

रामशेज किल्ल्यावर सध्या पावसाळी पर्यटकांचा मोठा वावर आहे. यात टवाळखोर, हुल्लडबाजी करणारे अधिक आहेत. आम्ही आजपर्यंत कित्येक पत्रे देऊनही वनविभाग व पोलिस यंत्रणेच्या पायथ्याला नोंदणी चौकी उभारली नाही. असुरक्षित रामशेजवर अनेक अपघात, छेडछाड, अनुचित प्रकार घडतात. याकडे वनविभाग, पोलिस, दिंडोरी तहसीलदार यांनी लक्ष घालावे.
– राम खुर्दळ, संस्थापक, शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था, नाशिक

हेही वाचा :

The post नाशिक : रामशेज किल्ल्यावरील पर्यटन ठरतेय जीवघेणे appeared first on पुढारी.