नाशिक : ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ सेवा पंधरवड्यात होणार तक्रारींचा निपटारा

राधाकृष्ण गमे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्या’चा विभागात शनिवारी (दि.17) प्रारंभ करण्यात आला असून 2 ऑक्टोबरपर्यंत राबविण्यात येणार्‍या पंधरवड्यांतर्गत प्रलंबित अर्ज व तक्रारींचा निपटारा करण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिली.

राज्य शासनाने सामान्य नागरिकांचे प्रलंबित अर्ज, तक्रारी यांचा कालमर्यादेत निपटारा होण्यासाठी सेवा पंधरवडा राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यात आपले सरकार, महावितरण, डीबीटी, नागरी सेवा केंद्र, विभागांचे स्वत:चे पोर्टल अशा वेबपोर्टलवर दि. 10 सप्टेंबरपर्यंत आलेल्या तक्रारींचा निपटारा करण्यात येणार आहे. मदत आणि पुनर्वसन, कृषी, महसूल, अन्न व नागरी पुरवठा, ग्रामविकास, नगरविकास, आरोग्य, पाणीपुरवठा, महावितरण, आदिवासी विकास, सामाजिक न्याय या विभागांतील सेवांचाही यात समावेश करण्यात आला आहे.

विविध विभागांच्या 14 सेवा 
पंधरवड्यात विविध विभागांच्या 14 सेवांचा समावेश करण्यात आला आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना नवीन शासन निर्णयानुसार मदतीचे वितरण करणे, तांत्रिक अडचणींमुळे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या प्रलंबित असलेल्या पात्र लाभार्थ्यांना लाभ देणे, फेरफार नोंदीचा निपटारा करणे, शिधापत्रिकांचे वितरण, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, मालमत्ता हस्तांतरण नोंद घेणे, नव्याने नळजोडणी, मालमत्ताकराची आकारणी करणे व मागणी पत्र देणे, प्रलंबित घरगुती वीजजोडणीस मंजुरी देणे, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेंतर्गत सिंचन विहिरीकरिता अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी करणे, अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना प्रलंबित वनहक्क पट्टे मंजूर करणे (अपील वगळून), दिव्यांग प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र देणे अशा सेवांचा समावेश असेल. महसूल विभागातील पाचही जिल्ह्यांत हा पंधरवडा अतिशय प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याचे गमे यांनी सांगितले.

हेही वाचा:

The post नाशिक : ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ सेवा पंधरवड्यात होणार तक्रारींचा निपटारा appeared first on पुढारी.