नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार शांताराम तात्या आहेर यांचे निधन

निधन www.pudhari.news

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा

देवळा तालुक्याची पहाट आज अतिशय दुःखद उगवली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार शांताराम तात्या आहेर यांचे गुरुवारी, दि.20 रात्री साडे बारा वाजता अल्पश: आजाराने निधन झाले. वयाच्या ७९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

तात्या हे अतिशय लोकप्रिय असल्याने त्यांचा जिल्ह्याच्या राजकारणात दबदबा होता. पाच -सहा दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना नाशिक येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असताना गुरुवारी रात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने नाशिक जिल्ह्यासह देवळा तालुक्यात शोककळा पसरली आहे.

तालुक्यासाठी मोठी धक्कादायक बातमी असून लाडक्या तात्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी (दि.२१) दुपारी २ वाजता देवळा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. आजपर्यत तात्यांनी अनेक पद भूषवली असून वसाकाचे चेअरमन म्हणून देखील त्यांचे काम महत्वाचे ठरले आहे. त्याचबरोबर आमदारकी देखील भूषवली असून त्यांचा मतदारसंघात चांगलाच प्रभाव होता. वरिष्ठांशी त्यांचे असलेले जिव्हाळ्याचे संबंध नेहमी अधोरेखित झाले आहेत. त्यामुळे देवळा तालुका एका मोठ्या नेतृत्वाला मुकला आहे. त्यांच्या जाण्याने जिल्ह्याची प्रचंड मोठी हानी झाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

अंतिम दर्शन www.pudhari.news
देवळा : माजी आमदार शांताराम तात्या आहेर यांचे अंत्यदर्शन घेतांना तहसीलदार विजय सूर्यवंशी ,पोलीस निरीक्षक दिलीप लांडगे ,नायब तहसिलदार विजय बनसोडे. (छाया: सोमनाथ जगताप)

 

नाशिक जिल्ह्याच्या राजकारणातील निष्कलंक, निस्वार्थी, एक संघर्षयोद्धा, चारित्र्यवान, दिलेल्या शब्दाला जागणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती. त्याचप्रमाणे जिल्ह्याच्या राजकारणातील विविध पदे यशस्वीपणे निभावलेला एक आदर्श नेता म्हणून त्यांची जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात ओळख होती. त्यांच्या जाण्याने तालुक्यासह पक्षाचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले ,एक मुलगी ,सुना ,नातवंडे असा परिवार आहे .बाजार समितीचे माजी सभापती योगेश आबा आहेर व माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मीकांत आहेर यांचे ते वडील होत.

हेही वाचा:

The post नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार शांताराम तात्या आहेर यांचे निधन appeared first on पुढारी.