नाशिक : राष्ट्रीय बालहक्क आयोगाकडूनच अनाथाश्रम, बालगृहांची चौकशी

आधारतीर्थ आश्रम विनापरवानगी,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

त्र्यंबकेश्वर येथील आधारतीर्थ आश्रमातील चिमुकल्याचा खून व पंचवटीतील गुरुकुल आधाराश्रमात संस्थाचालकाकडून अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराची गंभीर दखल राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाने घेतली आहे. आयोगाचे प्रबंधक (रजिस्ट्रार) अनु चौधरी या बुधवारी (दि.७) नाशिकमध्ये डेरेदाखल होत समिती नेमून शहरासह जिल्ह्यातील इयत्ता बारावीपर्यंत विद्यार्थी राहत असलेले अधिकृत, अनधिकृत आश्रम, आधाराश्रम, निवारागृह, आश्रमशाळा, बालगृहांची पाहणी करून अहवाल तयार करण्याचे आदेश बजावले. त्यात त्रुटी आढळून आल्यास संबंधित यंत्रणांना कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

जिल्ह्यातील आश्रमात साडेतीनवर्षीय मुलाचा अल्पवयीन मुलाने गळा आवळून खुनाचा प्रकार उघडकीस आला. तसेच अन्य एका प्रकरणात संस्थाचालकानेच आश्रमातील सात अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याचे उघडकीस आले. दोन्ही प्रकरणांमध्ये आश्रमास कोणत्याही शासकीय विभागाची परवानगी नसल्याचे आढळून आले. संस्थाचालकांनी धर्मादायाकडील मान्यताप्राप्त संस्थांचे नाव वापरून आश्रम सुरू केल्याचे आढळून आले. त्यामुळे शून्य १८ वयोगटांतील मुलामुलींना बेकायदेशीरपणे ठेवून त्यांच्या नावे देणग्या गोळ्या केल्याचे समोर आले आहे. दरम्यान, नाशिकमधील या प्रकरणांची दखल राष्ट्रीय आयोगाच्या बाल हक्क संरक्षण समितीने घेतली. या समितीच्या अनु चौधरी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत आढावा घेतला. तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. त्यात स्थानिक पोलिस निरीक्षक, गटविकास अधिकारी, शहरात असल्यास मनपा प्रतिनिधी, बालविकास प्रकल्पाधिकारी, आदिवासी विकास, समाजकल्याण विभागाचे प्रतिनिधी असतील.

…संस्थाचालक रडारवर

शहर व ग्रामीण भागात १८ वयोगटांच्या आतील मुलामुलींना ठेवलेल्या सर्व आश्रमशाळा, आधाराश्रम, निवारागृह, बालगृह आदी ठिकाणांची पाहणी या समितीमार्फत होणार आहे. सात दिवसांत अहवाल तयार करून संबंधित ठिकाणे अधिकृत की अनधिकृत आहेत, बालकांना सांभाळण्यासाठी असणाऱ्या निकषांची पूर्तता होत आहे की नाही, हे तपासले जाणार आहे. नियमबाह्य प्रकार आढळून आल्यास त्या संस्थेवर व संस्थाचालकांवर संबंधित शासकीय विभागामार्फत कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा :

The post नाशिक : राष्ट्रीय बालहक्क आयोगाकडूनच अनाथाश्रम, बालगृहांची चौकशी appeared first on पुढारी.