नाशिक : रासायनिक खतांसाठी शेतकर्‍यांची धावाधाव; रब्बीचा हंगाम अडचणीत

शेतकरी www.pudhari.news

दिंडोरी : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यात महिन्यापासून महत्त्वाच्या रासायनिक खतांची टंचाई निर्माण झाली आहे. पिकांना पाहिजे ते खत उपलब्ध होत नसल्यामुळे उत्पादनात घट निर्माण होण्याची चिन्हे आहेत. नाशिक जिल्ह्यासह तालुक्यातील कृषी विभागाने रासायनिक खते उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.

तालुक्यात सध्या युरिया 10.26.26 आणि 24.24.0 ही खते गेल्या एक महिन्यापासून कृषी केंद्रामध्ये कुठेही उपलब्ध नाहीत. त्यामुळे पिकांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट निर्माण होत आहे. त्यात विद्राव्य खताच्या गोणीची किंमत पाच हजारांपर्यंत पोहोचल्यामुळे शेतकरी दाणेदार रासायनिक खतांना पसंती देताना दिसत आहे. यंदा अतिवृष्टीमुळे जमिनीची धूप मोठ्या प्रमाणात झाली आहे. जमिनीतील सर्व खते व अन्नद्रव्ये वाहून गेल्यामुळे सध्या पिकांच्या वाढीसाठी व फळे व भाजीपालाच्या पोषणासाठी उत्पादनवाढीसाठी पिकांना त्वरित लागू होणार्‍या रासायनिक खताची नितांत आवश्यकता आहे. खरीप हंगामातसुद्धा खतांची टंचाई निर्माण झाली होती. त्यात आता रब्बीच्या गहू, कांदा व इतर भाजीपाला पिकांचा हंगाम जोरात असताना रासायनिक खतांच्या टंचाईमुळे बळीराजा संकटात सापडला आहे. त्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दिंडोरी तालुक्यात बारमाही भाजीपाला व फळबागांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. तालुक्यात बरेच शेतकरी सेंद्रिय पद्धतीने शेती करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, अजून तरी 100 टक्के सेंद्रिय शेतीचा प्रयोग चालू आहे, असे म्हणणे अवघड होईल. त्यामुळे सेंद्रिय खताबरोबर सध्या रासायनिक खतांची आवश्यकता पिकांना लागत आहे. सध्या तालुक्यात टोमॅटो, दुधी भोपळा, कारली, दोडका, घेवडा, भेंडी या भाजीपाला पिकांची लागवड होणार आहे. यासाठी कृषी रासायनिक खते उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी होत आहे.

खतांच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढल्याने शेतकरी हतबल झाला आहे. मुसळधार पावसाने वारंवार जमीन धुतली जात असून, सेंद्रिय खते पिके त्वरित घेत नसल्यामुळे पर्याय म्हणून रासायनिक खतांची पिकांना मात्रा द्यावी लागते. परंतु महत्त्वाची रासायनिक खते उपलब्ध नसल्यामुळे पिकांवर विपरीत परिणाम पाहण्यास मिळत आहे. – जयदीप देशमुख, शेतकरी, करंजवण.

दिंडोरी तालुक्यात येत्या चार-पाच दिवसांत युरिया खत उपलब्ध होणार असून, शेतकरीवर्गाने कृषी केंद्रामध्ये उपलब्ध असलेल्या पर्यायी खतांचाही वापर करावा. युरिया खत उपलब्ध झाल्यास तालुक्यातील सर्व कृषिकेंद्रांना कोणतेही लिंकिंग न करता खते शेतकरीवर्गाला द्यावी, अशा सचूना देण्यात आल्या आहे. – दीपक सांबळे, कृषी अधिकारी, पं. समिती दिंडोरी.

हेही वाचा:

The post नाशिक : रासायनिक खतांसाठी शेतकर्‍यांची धावाधाव; रब्बीचा हंगाम अडचणीत appeared first on पुढारी.