नाशिक : राहुड घाटाजवळ महिलेची बसमध्येच प्रसूती

मालेगाव www.pudhari.news

नाशिक (उमराणे) : पुढारी वृत्तसेवा
नाशिक येथून मालेगावसाठी निघालेल्या गर्भवती महिलेने उमराणे गावाजवळील राहुड घाटाजवळ नाशिक – मालेगाव बसमध्येच शुक्रवारी (दि. 2) गोंडस मुलाला जन्म दिला.

मालेगाव येथील आयेशानगर भागात राहणार्‍या नाजमीन शेख यांचे नाशिक येथे माहेर असून गुरुवारी (दि. 1) नाशिक येथे द्वारकाजवळ राहणार्‍या त्यांच्या आईचे निधन झाले. त्यांच्या दफनविधीसाठी नाझमी यांना नेले होते. शुक्रवारी पहाटे त्यांना त्रास सुरू झाला म्हणून ठक्कर बाजारजवळच्या जिल्हा रुग्णालयामध्ये त्यांना दाखल केले होते. प्रसव वेदना जास्त होत असल्याबद्दल त्यांनी वेळोवेळी संबंधित डॉक्टरांना सांगितले होते. दुपारी 1 वाजून गेला, तरी या रुग्णालयातील डॉक्टरांनी व्यवस्थित लक्ष दिले नाही व प्रसूती होण्यास दोन दिवस लागतील, असे सांगितले होते. त्यामुळे त्यांच्या परिवाराने मालेगावी जाण्याचा निर्णय घेतला होता. दुपारी 2 ला मालेगाव आगाराच्या नाशिक – मालेगाव (एमएच 20 जीसी 2837) या बसमध्ये नाजमीन शेख पती आबीद शेख यांच्यासह मालेगाव येण्यास निघाल्या होत्या. राहुड घाटात गतिरोधकावर बस आदळल्याने जास्त त्रास होऊ लागला व घाट पास झाल्यानंतर बसमध्येच बाळाचा जन्म झाला. यावेळी वाहक सुरेखा वाघ व महिला प्रवाशांनी तत्परता दाखवून प्रसूती केली. चालक विजय नेरकर यांनी समयसूचकता दाखवून तत्काळ बस सौंदाणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेली. वैद्यकीय अधिकारी डॉ. अक्षय ततार, डॉ. ऐश्वर्या पणपालिया, डॉ. राकेश पवार, डॉ. राजेश सावंत, सुरेखा देवरे, आरोग्यसेविका लीला आहेर, उमेश ठोके आदी प्राथमिक आरोग्य कर्मचार्‍यांनी तत्काळ वैद्यकीय मदत केली. बाळ सुखरूप असून शेख यांनी बस वाहक व चालक यांनी मदत केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. तसेच नाशिकच्या जिल्हा रुग्णालयामध्ये मिळालेल्या वागणुकीबद्दल संताप व्यक्त केला आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : राहुड घाटाजवळ महिलेची बसमध्येच प्रसूती appeared first on पुढारी.