नाशिक : रुग्णांसाठी तक्रार निवारण कक्ष नावालाच…!

रूग्णालय

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
रुग्णालयात रुग्णांच्या तक्रारींचे निरसन करण्यासाठी तक्रार निवारण कक्ष कायद्याने बंधनकारक असताना राज्यात केवळ 15 ठिकाणी तक्रार निवारण कक्ष असल्याची माहिती अधिकारातून समोर आली आहे.

सांगली व कोल्हापूर या दोनच ठिकाणी तक्रारींसाठी स्वतंत्र टोल फ्री नंबर सुरू आहेत. कोविड साथीच्या काळात शासनाने रुग्णांना संरक्षण देण्यासाठी ’महाराष्ट्र नर्सिंग होम रजिस्ट्रेशन क्ट – नियम 2021’ नुसार महत्त्वाच्या तरतुदी केल्या आहेत. त्यानुसार रुग्ण हक्कांच्या संरक्षणासाठी प्रत्येक रुग्णालयाने रुग्ण हक्क सनद, दरपत्रक व तक्रार निवारण कक्षाची माहिती दर्शनी भागात लावणे कायद्याने बंधनकारक केले आहे. मात्र दोन वर्षे उलटूनही या तरतुदींची अंमलबजावणी केली नसल्याचे माहिती अधिकारातून स्पष्ट झाले आहे.

वैद्यकीय अधिकार्‍याने तक्रार निवारण कक्ष स्थापन केला पाहिजे असा कायदा आहे. त्यानुसार डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. पण, तिथे एकही तक्रार नोंदवली गेली नाही. – संतोष जाधव, समन्वयक, जनआरोग्य समिती, नाशिक

सर्व जिल्ह्यात तक्रार निवारण कक्ष व टोल फ्री नंबर सुरू करण्याची मागणी जनआरोग्य अभियानाच्या वतीने करण्यात आली आहे. राज्यात तक्रार निवारण कक्ष कुठे स्थापन झाले याबाबत जनआरोग्य समितीने राज्याच्या आरोग्य विभागाकडे माहिती विचारण्यात आली होती. 11 महानगरपालिका, 8 जिल्हा परिषद व 2 शल्य चिकित्सक (सिव्हिल सर्जन) कार्यालय अशा 21 ठिकाणांवरून माहिती मिळाली आहे. माहिती मिळालेल्या 21 ठिकाणांपैकी कोल्हापूर, नागपूर, भिवंडी, निजामपूर, पुणे, मालेगाव, सांगली महानगरपालिका औरंगाबाद, कोल्हापूर, धुळे, वाशिम, पालघर, चंद्रपूर, सोलापूर या जिल्हा परिषद व अमरावती आणि अहमदनगर येथील शल्य चिकित्सक कार्यालय अशा 15 ठिकाणी तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. तर इतर 6 ठिकाणी तक्रार निवारण कक्ष स्थापनेची प्रक्रिया सुरू असल्याचे उत्तरात म्हटले आहे.

रुग्ण हक्क हा लोकशाहीतील सामान्य माणसाचा महत्त्वाचा अधिकार आहे. रुग्णालयात रुग्णांची अडवणूक होऊ नये, त्यांना मदत मिळावी, न्याय मिळावा यासाठी प्रत्येक ठिकाणी तक्रार निवारण कक्ष असणे गरजेचे आहे. यामुळे रुग्ण आणि रुग्णालय यांच्यात पारदर्शकता निर्माण होईल. – डॉ. अभय शुक्ला, राष्ट्रीय सहसंयोजक, जनस्वास्थ अभियान, पुणे.

हेही वाचा:

The post नाशिक : रुग्णांसाठी तक्रार निवारण कक्ष नावालाच...! appeared first on पुढारी.