नाशिक : रेशनचे धान्य काळ्या बाजारात विक्रीचा डाव उधळला

igatpuri www.pudhari.news

नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा
इगतपुरी तालुक्यातील गडगडसांगवी येथील स्वस्त धान्य दुकानातील धान्य काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी घेऊन जात असताना उपसरपंच आणि ग्रामस्थांनी रंगेहाथ पकडल्याची घटना घडली होती. या प्रकरणी स्वस्त धान्य दुकानदार अनिता गोपाळा लहांगे व बाळासाहेब रामभाऊ मते या संशयित आरोपींवर वाडीवर्‍हे पोलिस ठाण्यात अत्यावश्यक वस्तू अधिनियमानुसार गुन्हा दाखल झाला आहे.
इगतपुरीचे तालुका पुरवठा निरीक्षक भरत भावसार (54, चेतनानगर, नाशिक) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. संशयित आरोपी अनिता लहांगे या इगतपुरी पंचायत समितीचे माजी सभापती गोपाळा लहांगे यांच्या सौभाग्यवती आहेत.

फिर्यादीत म्हटले आहे की, मंगळवारी (दि. 30) सकाळी सव्वानऊच्या सुमारास गडगडसांगवी येथील उपसरपंच रतन शिंदे यांनी फोनवरून गावातील रेशन दुकानदार बाळासाहेब मते हा गाडीत स्वस्त धान्य दुकानातील तांदूळ व गहू काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जात असताना गाडीसह पकडले आहे. तुम्ही लवकर या, असे कळविले. त्यानुसार गडगडसांगवी येथे जाऊन खात्री केली असता चौफुलीवर लोकांची गर्दी जमलेली होती. छोटा हत्ती (एमएच 05 डीआर 2536) हा तेथेच उभा होता. उपसरपंच शिंदे, खंडू बेंडकोळी, दत्तू पाडेकर, दिलीप शिंदे आदींच्या सतर्कतेने हा प्रकार समोर आला.

अंत्योदय योजनेचे जप्त केलेले धान्य
सदरचे धान्य अंत्योदय योजना व प्राधान्य योजनेंतर्गत शिधावाटपासाठी राखीव असलेले धान्य होते. त्यात 50 किलोप्रमाणे एकूण 32 कट्टे तांदूळ व 50 किलोप्रमाणे 1 कट्टा गहू असे एकूण 33 कट्टे असे बाजारभावाप्रमाणे 48 हजार रुपयांचा तांदूळ तसेच 1 हजार रुपयांचा गहू असा एकूण 49 हजार रुपये किमतीचा माल मिळून आल्याने पंचांसमक्ष सविस्तर पंचनामा करण्यात आला. त्यानंतर पुन्हा 33 कट्टे सरकार मान्य स्वस्त धान्य दुकान क्र. 111 मध्ये पंचांसमक्ष सील करून ठेवण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : रेशनचे धान्य काळ्या बाजारात विक्रीचा डाव उधळला appeared first on पुढारी.