नाशिक : लम्पीने केला बागलाणमध्ये शिरकाव

लम्पीस्किनचा फैलाव

नाशिक (डांगसौंदाणे) : पुढारी वृत्तसेवा
बागलाण तालुक्यातील एक लाख पाच हजार पशुधनाला लम्पी या संसर्गजन्य रोगापासून वाचविण्यासाठी तालुक्याचा पशुसंवर्धन विभाग सतर्क झाला आहे.

बागलाण तालुक्यात सात जनावरांना लम्पी या साथीच्या रोगाची लागण झाल्याची प्राथमिक माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली आहे. यामध्ये पाहिल्या टप्यात 5 हजार लसींच्या डोसची मागणी करण्यात आल्याची माहिती तालुका पशुधन अधिकाऱ्यांनी दिली आहे. तर लम्पी आजारांवरील औषधसाठा देखील उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली आहे. तालुक्यातील मोठ्या प्रमाणात असलेल्या पशुधनाला सेवा देण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची 11 पदे मंजुर असतांना केवळ एकच पद भरले आहे. त्यामुळे रिक्त पदांमुळे लाखभर पशुधनाला सेवा देताना पशुसंवर्धन विभागाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. लम्पी या संसर्गजन्य आजाराची तालुक्यात कोटबेल, मुंजवाड, पिंपळदर या ठिकाणी जनावरे आढळून आल्याने तालुका पशुसंवर्धन विभाग सतर्क झाला आहे. पहिल्या टप्प्यातील 5 हजार लसी उपलब्ध होण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने वरिष्ठ स्तरावर मागणी केली आहे तर बहुतांश पशुपालक खाजगी लस घेऊन पाळीव जनावरांना लस देत असल्याची माहिती तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सी. पी. रुद्रवंशी यांनी दिली आहे. लम्पी हा आजार गाय, म्हैस, बैल व अन्य पाळीव जनावरांमध्ये येत असल्याने शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन तालुका पशुसंवर्धन विभागाने केले आहे.

सायंकाळच्या वेळेस जनावरांच्या गोठ्यात डास, मच्छर, चिलटे, गोचिड व अन्य चावणारे कीटक येऊ नयेत. यासाठी गोठ्यात धूर करावा कडूनिंबाचा पाला जाळण्यात यावा. दोन जनावरे यांच्यामध्ये अंतर ठेवावे. गोठ्यात निर्जंतुकीकरणाचे फवारे मारण्यात यावे. पशुपालकांनी काळजी घेतल्यास लम्पी या संसर्गजन्य आजाराला आळा घालता येणार आहे. डॉ. सी. पी. रुद्रवंशी, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी.

पशुवैद्यकीय अधिका-यांची कमतरता:

बागलाण हा कृषी समृद्ध तालुका असुन मोठ्या प्रमाणत पशुपालक या तालुक्यात आहेत. लाखाहून अधिक जनावरे तालुक्यात आहेत. मात्र त्यांना आरोग्य सेवा देण्यासाठी गेली अनेक वर्षे पासून रिक्त जागेवर पशुवैद्यकीय अधिकारीच उपलब्ध नसल्याने एकाच पशुवैद्यकीय अधिका-यावर तालुक्याची संपूर्ण जबाबदारी असल्याने तालुक्यातील अनेक ठिकणी आजारी व दूभते जनवरांना वेळेवर उपचार मिळण्यात अडचणी निर्माण होत आहे. अनेक वेळा प्रशासनाकडे मागणी करूनही तालुक्याला पशुवैद्यक मिळत नसल्याने तालुक्यातील पशुपालकांमध्ये मोठया प्रमाणावर नाराजी आहे. तालुक्यातील सर्व पशुवैद्यकीय रुग्णालयात पूर्णवेळ पशुवैद्यक देण्यात यावा. अशी  मागणी बागलाणच्या माजी आमदार दिपीका चव्हाण यांनी केली आहे. तर लंपी आजारावर जास्तीत जास्त त्वरीत लसीकरण करून तालुका लम्पी आजार मुक्त करण्याचा मानस रुद्रवंशी यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : लम्पीने केला बागलाणमध्ये शिरकाव appeared first on पुढारी.