नाशिक : लाचखोर बागूलांविरोधात अपसंपदेचा गुन्हा दाखल होणार

लाचखोर बागूल नाशिक,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
कंत्राटदाराकडून 28 लाख 80 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडलेल्या आदिवासी विकास विभागाच्या सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता दिनेशकुमार बुधा बागूल यांच्याविरोधात अपसंपदेचा गुन्हा दाखल होणार आहे. यासंदर्भात त्यांच्या मालमत्तेची खुली चौकशी होणार असून, गुन्हा दाखल करण्याची परवानगी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शासनाकडे मागितली आहे.

आदिवासी वसतिगृहातील सेंट्रल किचनच्या कामाचे कार्यारंभ आदेश देण्याच्या मोबदल्यात बागूल यांनी तक्रारदार कंत्राटदाराकडे 28 लाख 80 हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून 25 ऑगस्टला बागूल यांना त्यांच्या निवासस्थानी लाच घेताना रंगेहाथ पकडले. त्यांच्या घराची झडती घेतली असता, घरात 98 लाख 63 हजार रुपयांची रोकड आढळून आली. बागूलांच्या घरातून कागदपत्रांची एक बॅग इमारतीच्या खाली फेकण्यात आली होती. या बॅगेत महत्त्वाची कागदपत्रे व मालमत्तेसंबंधी काही कागदपत्रे आढळून आली होती. त्याचप्रमाणे पुण्यातील घरातूनही पथकाने 45 लाख रुपयांची रोकड जप्त केली.

या पैशांचा हिशेेब तपासला जात असून, ज्ञात स्रोतांपेक्षा जास्त उत्पन्न आढळून येत असल्याने बागूल यांच्याविरोधात अपसंपदेचा गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्याचप्रमाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नाशिक व धुळे येथील बँकांसह उपनिबंधक कार्यालयांशी पत्रव्यवहार करून बागूल यांच्या नावाने असलेली बँक खाती, लॉकर, स्थावर मालमत्ता यांची माहिती मागवली आहे. ही आढळून आल्यास ती गोठवली जाणार असून, स्थावर मालमत्तेचे व्यवहार रोखले जाऊ शकतात. त्यामुळे येत्या काही दिवसांत बागूल यांच्या नावे किती रोकड व स्थावर मालमत्ता आहे याचा तपशील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या हाती लागण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : लाचखोर बागूलांविरोधात अपसंपदेचा गुन्हा दाखल होणार appeared first on पुढारी.