नाशिक : लाच घेतल्याप्रकरणी खरे, पाटील यांना न्यायालयीन कोठडी

न्यायालय

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
लाच घेतल्याप्रकरणी अटकेत असलेल्या जिल्हा उपनिबंधक सतीश खरे व जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. वैशाली पाटील यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. मात्र, वैद्यकीय चाचणीदरम्यान दोघांच्या छातीत कळ आल्याने व रक्तदाब वाढल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. सुमारे दोन तासांनंतर रक्तदाब नियंत्रणात आल्याने त्यांची रवानगी मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली. दरम्यान, दोघेही रुग्णालयात मुक्त वावरत असताना व त्यांच्याशी इतर व्यक्ती संवाद साधत असताना मुक्कामाची घडी न बसल्याने त्यांना कारागृहात जावे लागल्याची चर्चा रुग्णालयात रंगली होती.

पोलिस कोठडीची मुदत संपल्याने खरे, पाटील व इतर दोघा लाचखोर आरोग्यसेवकांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने चौघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, सायंकाळी पाचनंतर खरे जिल्हा न्यायालयात वैद्यकीय तपासणीसाठी आले. डॉ. वैशाली पाटील यादेखील कक्षात दाखल झाल्या. या दरम्यान, दोघांकडील हितचिंतकांची रुग्णालयात गर्दी झाल्याने तो चर्चेचा विषय बनला होता. दोघांभोवती खासगी व्यक्ती विनाअडथळा संवाद साधत असल्याने सुरक्षिततेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले. यावेळी अनेकांनी रुग्णालयातील वरिष्ठ अधिकार्‍यांचा संपर्क क्रमांकही घेतल्याने कारागृहाऐवजी रुग्णालयातच मुक्काम करण्याच्या दोघांच्या हालचाली स्पष्ट होत होत्या. मात्र, याबाबत चर्चा झाल्यानंतर कर्तव्यावरील वैद्यकीय अधिकार्‍यांनी सावध भूमिका घेतल्याने दोघांचा डाव फसल्याचे बोलले जाते. त्यामुळे दोघांनाही नाईलाजाने पोलिसांच्या वाहनात बसावे लागले. अखेर सायंकाळी सातनंतर दोघांचीही रवानगी कारागृहात करण्यात आली.

डॉ. पाटील यांच्याकडे 81 तोळे सोने
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या झडतीत डॉ. वैशाली पाटील यांच्याकडे घरझडतीत 10 व बँकेच्या लॉकरमध्ये 71 तोळे असे एकूण 81 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आढळून आले. त्याचप्रमाणे डॉ. पाटील यांचे निलंबनही प्रस्तावित असल्याचे समजते.

हेही वाचा:

The post नाशिक : लाच घेतल्याप्रकरणी खरे, पाटील यांना न्यायालयीन कोठडी appeared first on पुढारी.