नाशिक : लालपरीला स्थानकांची प्रतीक्षा; प्रवाशांचे हाल

एसटी

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा
तालुक्याचा औद्योगिक क्षेत्रातील पंढरी म्हणून संपूर्ण जिल्ह्यात नावलौकिक आहे. परंतु आजही तालुक्यातील महत्त्वाच्या गावांना लालपरीसाठी स्थानक नसल्याने प्रवासीवर्गाचे मोठ्या प्रमाणावर हाल होतानाचे चित्र आहे.

नुकतेच आदिवासी उपयोजनेतून दिंडोरी, पेठ, सुरगाणा, कळवण आदी ठिकाणच्या बसस्थानकांसाठी शासनाकडून 35 कोटी रुपये मंजूर झाले असून, या ठिकाणांच्या बसस्थानकांना झळाळी मिळणार आहे. ज्या गावांना बसस्थानक नाही त्या गावांना बसस्थानक केव्हा मिळणार, असाही सवाल प्रवाशांकडून विचारला जात आहे. तालुक्यातील लखमापूर, लखमापूर फाटा, वलखेड फाटा, अक्राळे फाटा, खतवड फाटा, वरखेडा तसेच तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील अनेक गावांना आजमितीला बसस्थानक नसल्याने येथील प्रवासी, विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल पाहायला मिळत आहे. फक्त ‘ हात दाखवा बस थांबवा’ या ब्रीदवाक्याप्रमाणे या ठिकाणी बस थांबते व प्रवासीवर्गाला ने-आण करते. विशेष म्हणजे लखमापूर फाटा हा दळणवळणांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्रवासी, नागरिक यांची गर्दी मोठी असते. तसेच लखमापूर गावातून तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी दहेगाव, वागळुद, म्हेळुसके, ओझे, करंजवण आदी ठिकाणचे प्रवासी मोठ्या प्रमाणावर येतात. परंतु येथेही बसस्थानक नसल्याने प्रवासीवर्गात संताप व्यक्त केला जात आहे. बसस्थानक नसल्याने भर उन्हाळ्यात व पावसाळ्यात मिळेल त्या ठिकाणी आश्रय घेऊन उभे राहावे लागते. तो पर्यंत बस निघून जाते. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते. 1981 ते 2001 पर्यंत लखमापूर फाट्यावर बसस्थानक होते. परंतु ते बसस्थानक आता नजरेआड गेले आहे. तालुक्यात काही गावांना बसस्थानक आहे. पण, ज्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची वर्दळ आहे, नेमके त्याच गावांना बसस्थानक नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे. तालुक्यातील काही गावांना खासदार, आमदार निधीतून बसस्थानकांची निर्मिती करण्यात आलेली आहे. परंतु लखमापूर गाव, लखमापूर फाटा, वलखेड फाटा, वनारवाडी फाटा, अक्राळे फाटा, खतवड फाटा, पिंपळणारे फाटा इ.गावांना बसस्थानक का नाही ? असा संतप्त सवाल नागरिकांमधून निघत आहे.

ग्रामीण भागात अनेक ठिकाणी बसस्थानके नसल्याने पावसाळ्यात, हिवाळ्यात प्रवाशांना कुठेतरी टपरीजवळ, हॉटेलजवळ, अथवा दुकानच्या पडवीमध्ये जीव मुठीत घेऊन आश्रय घ्यावा लागत आहे. – अजित कड, उपसरपंच, दहेगाव, ता. दिंडोरी.

हेही वाचा:

The post नाशिक : लालपरीला स्थानकांची प्रतीक्षा; प्रवाशांचे हाल appeared first on पुढारी.