नाशिक, लासलगावसह नऊ बाजार समित्यांची निवडणूक जानेवारीत

निवडणूक www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्यातील 31 डिसेंबर 2022 अखेर निवडणुकीस पात्र असलेल्या 281 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम मंगळवारी (दि.6) राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या वतीने जाहीर करण्यात आला असून, त्यात जिल्ह्यातील नाशिकसह नऊ बाजार समित्यांचा समावेश आहे. पुढील वर्षी 29 जानेवारीला मतदान होणार आहे. या नऊ बाजार समित्या आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या ताकदवान असल्याने अनेक आमदारांचे भवितव्यही पणाला लागणार आहे.

कोरोना तसेच न्यायालयाच्या आदेशाने तब्बल दोन वर्षे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका दोन वर्षे लांबणीवर पडल्या होत्या. केवळ लासलगाव व पिंपळगाव बसवंतच्या बाजार समिती संचालक मंडळाला मुदतवाढ मिळाली होती. निवडणूक प्राधिकरणाने ऑक्टोबरमध्ये समित्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. मात्र, त्यावेळी मतदारयादीत कोणत्या संचालकांना घ्यायचे, याबद्दल न्यायालयीन लढाई सुरू झाली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठासमोर 13 याचिका होत्या. त्या उच्च न्यायालयाने निवडणुकीस पात्र विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या निवडणुका तातडीने पूर्ण करून त्यानंतर बाजार समित्यांच्या निवडणुका पूर्ण करण्याबाबत आदेश दिले. त्यानुसार मंगळवारी (दि.6)राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने बाजार समिती यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम प्रसिद्ध केला आहे. नाशिकसह नांदगाव, कळवण, येवला, चांदवड, पिंपळगाव, सिन्नर, लासलगाव, मालेगाव येथे निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.

अशी होणार निवडणूक
प्राथमिक कृषी पतसंस्था, बहुउद्देशीय सहकारी संस्था व ग्रामपंचायत यांचे सदस्य मतदार असल्यामुळे या सदस्यांची यादी 27 सप्टेंबरपर्यंत जिल्हा निवडणूक अधिकार्‍यांकडे सादर केली जाणार आहे. तसे आदेश संबंधित जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था व गटविकास अधिकारी यांना दिले आहेत. याशिवाय समितीतील परवानाधारक व्यापारी, आडते व हमाल, तोलाईदार हे बाजार समितीचे मतदार आहेत. त्यांचीही यादी
1 नोव्हेंबरपर्यंत बाजार समित्यांना सादर करावी लागणार आहे. प्रारूप मतदारयादी 14 नोव्हेंबरला तर अंतिम यादी 7 डिसेंबरला प्रसिद्ध
होणार आहे.

अशी संपली बाजार
समित्यांची मुदत
नाशिक- 19 ऑगस्ट 2020
नांदगाव- 19 ऑगस्ट 2020
कळवण- 28 ऑगस्ट 2020
येवला- 19 ऑगस्ट 2020
चांदवड -16 ऑगस्ट 2020
पिंपळगाव -2 ऑगस्ट 2020
सिन्नर- 20 ऑगस्ट 2020
लासलगाव -मे 2021
मालेगाव -मार्च 2021

हेही वाचा :

The post नाशिक, लासलगावसह नऊ बाजार समित्यांची निवडणूक जानेवारीत appeared first on पुढारी.