नाशिक : लॉजिस्टिक मॅनेजमेंटकडून ड्रायपोर्टच्या जागेची पाहणी

निफाड डायपोर्ट पाहणी,www.pudhari.news

नाशिक (पालखेड मिरचीचे) : पुढारी वृत्तसेवा

निफाडच्या ड्रायपोर्ट उभारणीच्या प्रस्तावाला गती देण्यासाठी आज लॉजिस्टिक मॅनेजमेंट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश गौर यांनी प्रस्तावित ड्रायपोर्टच्या जागेची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी खासदार गोडसे यांनी ड्रायपोर्टसाठी आवश्यक असणारा रेल्वेमार्ग, महामार्ग आणि पुरेशा जागेच्या उपलब्धतेची माहिती दिली.

राष्ट्रीय महामार्गाच्या लॉजिस्टिक मॅनेजमेंट कंपनीबरोबर काम करण्यास जेएनपीटीने सहमती दर्शविल्यानंतर निफाड येथे ड्रायपोर्ट उभारण्याचा मार्ग काहीसा मोकळा झाला आहे. प्रस्तावित जागा लॉजिस्टिक मॅनेजमेंट कंपनीच्या पसंतीस उतरल्याने प्रलंबित ड्रायपोर्ट प्रकल्प उभारण्याच्या कामाला गती येणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.

जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये भाजीपाल्यासह द्राक्ष, कांदा, डाळिंब, ऊस आदी शेतमाल मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो. उत्पादित शेतीमाल विक्रीसाठी जलदपणे देश, विदेशात पोहोचविता येण्यासाठी जिल्ह्यात ड्रायपोर्ट उभारण्यासाठी प्रयत्न सुरू होते. ड्रायपोर्ट प्रकल्पासाठी निफाड साखर कारखान्याची जागा प्रस्तावित आहे. प्रकल्पाच्या प्रस्तावास गती येण्याकामी लॉजिस्टिक मॅनेजमेंट कंपनी प्रशासनाकडून प्रत्यक्ष जागेची पाहणी करण्याची मागणी आरोग्य विभागाच्या केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार, खासदार हेमंत गोडसे यांच्याकडून सतत होत होती. या मागणीची दखल घेत लॉजिस्टिकचे गौर यांनी अधिकाऱ्यांसह निफाड येथील ड्रायपोर्ट प्रकल्पाच्या पाहणीसाठी निफाडला भेट दिली.

ड्रायपोर्ट प्रकल्प निफाड कारखान्याच्या एकशेदहा एकरांवर प्रस्तावित आहे. प्रस्तावित प्रकल्पाच्या आराखड्याचा नकाशा यावेळी खासदार गोडसे यांनी अधिकाऱ्यांना दाखविला. अगदीच तीस ते पस्तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या दिंडोरी, जानोरी, आक्रोळे, सिन्नर, सातपूर, अंबड येथील औद्योगिक वसाहतीची माहिती आणि पूरकता याविषयी खा. गोडसे यांनी अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर कसबे-सुकेणे शिवारातील रेल्वेमार्ग आणि आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या महामार्गाची पाहणी केली. पुरेशी जागा, अगदीच जवळ असलेला रेल्वेमार्ग आणि मुंबई-आग्रा तसेच नियोजित सुरत -चेन्नई महामार्ग पाहून गौर यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी कंपनीचे उपाध्यक्ष संजीव पाटील, नॅशनल हायवेचे संचालक भाऊसाहेब साळुंखे, नॅशनल हायवेचे तांत्रिक प्रबंधक दिलीप पाटील, अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधी, तहसीलदार श्याम घोरपडे, ना. भारती पवार यांचे स्वीय सहायक मनोज बेलदार, कारखान्याचे अवसायक बी. आर. धनवटे आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

The post नाशिक : लॉजिस्टिक मॅनेजमेंटकडून ड्रायपोर्टच्या जागेची पाहणी appeared first on पुढारी.