नाशिक : लॉजिस्टीक पार्क मनपा हद्दीबाहेर जाण्याची शक्यता

लॉजिस्टीक पार्क,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

आडगाव परिसरातील शंभर एकर जागेवर लॉजिस्टिक पार्क उभारण्याच्या पालिकेच्या योजनेवर पाणी फेरले जाण्याची शक्यता आहे. या प्रकल्पासाठीच्या जागेची चाचपणी करण्यासाठी नुकतेच केंद्रीय पथक नाशिकला येवून गेले. मात्र, त्यांनी आडगाव परिसरातील शंभर एकर जागेला ‘बायपास’ देत महापालिका हद्दीबाहेरील जागेची चाचपणी केल्याची माहिती समोर येत आहे.

महापालिका हद्दीत लॉजिस्टिक पार्क प्रकल्प उभारण्यासाठी मंजूरी देण्यात आली होती. केंद्रीय महामार्ग आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी स्थानिक प्रशासनाला शहरातील रस्त्यांची गर्दी कमी करण्यासाठी ट्रान्सपोर्ट लॉजिस्टिक पार्क उभारण्याची सूचना देखील केली होती. शिवाय आपल्या मंत्रालयाकडून मदतीचे आश्वासनही दिले होते. महापालिकेच्या माध्यमातून आडगावमध्ये ६० एकर जागेवर ट्रकसाठी पार्किगची व्यवस्था करण्याचे प्रस्तावित होते. त्यात महापालिकेच्या विस्तारासाठी १५ एकर जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देशित करण्यात आले होते. उर्वरित जागेसाठी नागरी नापिक व खडकाळ जागांचा शोध घेण्याचा प्रस्ताव होता. या बाबतचा सविस्तर अहवाल केंद्राकडे पाठवून मनपाने जागेबद्दल होकार कळवला होता. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या पहाणी पथकाने नाशिकच्या जागांची पाहणी करण्यासाठी विशेष दौरा आखला होता. मात्र, या भेटीत त्यांनी मनपाच्या हद्दीत पहाणी करणे तर सोडाच, मनपा अधिकार्‍यांशी संपर्कही साधला नसल्याची माहिती समोर येत आहे. पाहणी पथकाने परस्पर शहराच्या हद्दीबाहेरील जागांची पाहणी केल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, लॉजिस्टिक पार्कसाठी मुंबई, आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील आडगाव येथे ट्रक टर्मिनसची जागा आधीच उपलब्ध आहे. केंद्राच्या निधीतून प्रस्तावित लॉजिस्टिक पार्क उभारण्यासाठी ही जमीन देण्यास मनपाचा होकार आहे. मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग आणि सुरत-चेन्नई ग्रिनफिल्ड कॉरिडॉरच्या बिंदूवर तो उभारण्याचा प्रस्ताव होता. मात्र या प्रस्तावाला थंड बस्त्यात ठेवल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, लॉजिस्टिक पार्क महापालिका हद्दीबाहेर जाण्याची शक्यता असल्याने, या प्रकल्पाला विरोधाची सूर तीव्र होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : लॉजिस्टीक पार्क मनपा हद्दीबाहेर जाण्याची शक्यता appeared first on पुढारी.