नाशिक : लोहोणेरजवळ तिहेरी अपघात; कंटेनरची ठोस, दोन बसही धडकल्या

नाशिक (लोहोणेर) : पुढारी वृत्तसेवा
लोहोणेर – सटाणा रस्त्यावर लोहोणेरलगत असलेल्या सूरज पेट्रोल पंपाजवळ दोन बस व कंटेनरमध्ये झालेल्या अपघातात बसच्या वाहकासह 10 ते 12 प्रवाशी जखमी झाले आहेत.

नाशिक : राज्य परिवहन महामंडळाची धडकलेली बस.

दुपारी सव्वाच्या सुमारास सुमारास नंदूरबार – पालघर राज्य परिवहन महामंडळाची बस (एम.एच. 20 बी. एल. 4039) सटाणा येथून देवळाकडे जात असताना लोहोणेर गावाजवळच्या पेट्रोल पंपाच्या बाजूला असलेले गतिरोधक पास करीत असताना समोरून येणार्‍या नाशिक दोंडाईचा बसला (एम. एच. 14 बी. टी. 2180) पाठीमागून कांद्याच्या गोणी घेऊन जाणार्‍या कंटेनरने (जी जे 25 यु 5141) जोरदार धडक दिल्याने नाशिक – दोंडाईचा बस नंदुरबार – पालघर बसवर जाऊन धडकली. पालघर बसचा वाहक सुहास शिवराम आसगेसह दहा ते बारा प्रवाशी जखमी झाले आहेत. जखमींमध्ये पाच वर्षाच्या बालकाचा समावेश आहे. या अपघातास कारणीभूत ठरलेला कांद्याच्या गोणी घेऊन जाणारा कंटेनर बाजूच्या शेतात पलटी झाला. अपघात भीषण असला तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. जखमींना तातडीने लोहोणेरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले आहे. तर दोंडाईचा बसचा वाहक सुहास शिवराम आसगे (36, रा. जैताने, निजामपूर) यास दोन्ही डोळ्याच्या मध्ये मार लागल्याने व रघुनाथ फकीरा वाघ (56, रा. तळवाडे ) यांच्या उजव्या बाजूच्या खांद्याला मार लागल्याने त्यांना पुढील उपचारासाठी देवळा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. जखमींना येथील युवकांनी तातडीने उपचारासाठी आरोग्य केंद्रात हलविण्यात आले आहे. किरकोळ जखमींना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले. घटनास्थळी राज्य परिवहन महामंडळाच्या सटाणा आगाराचे व्यवस्थापक राजेंद्र आहिरे, वाहतूक निरीक्षक बस्ते, सहाय्यक वाहतूक निरीक्षक हर्षल कोठावदे यांनी भेट देऊन प्रवाशांची विचारपूस केली. कंटेनर चालक व क्लिनरबाबत कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. देवळा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक समीर बारावकर यांनी पोलिस कर्मचार्‍यांसह तातडीने घटनास्थळी दाखल होऊन अपघातामुळे झालेली वाहतूक कोंडी मोकळी केली. याबाबत अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : लोहोणेरजवळ तिहेरी अपघात; कंटेनरची ठोस, दोन बसही धडकल्या appeared first on पुढारी.