नाशिक : वडिलांचे अपहरण केल्याच्या संशयातून खून, 22 वर्षीय तरुणाला अटक

सिन्नर खून,www.pudhari.news

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील गोंदे येथील 22 वर्षीय तरुणाने आपल्या वडिलांचे अपहरण केल्याच्या संशयावरून 32 वर्षीय तरुणाला पाठलाग करून तलवारीने भोकसून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सिन्नर पोलिसांनी संशयित आरोपीचा शोध लावत त्याला गजाआड केले. प्रवीण चांगदेव तांबे (22, रा. गोंदे, ता. सिन्नर) असे संशियत आरोपीचे नाव आहे.

नाशिक-पुणे महामार्गालगत धोंडवीरनगर शिवारात बुधवारी (दि.1) संपत रामनाथ तांबे (32, रा. गोंदे) या ट्रकचालक तरुणाचा खून केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक माधुरी केदार-कांगणे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील व सिन्नरचे पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत संपत याच्याबाबत माहिती घेतल्यानंतर तो धोंडवीरनगर शिवार येथे आयशर वाहनावर बदली ड्रायव्हर म्हणून काम करीत असल्याची माहिती मिळाली.

पुणे येथे तपासकामी गेलेल्या पोलिस पथकास प्रवीण मिळून आला. त्यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता मृत संपत तांबे याने आरोपी प्रवीण तांबे याच्या वडिलांचे अपहरण केल्याचा राग मनात होता. त्याने बुधवारी सायंकाळच्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गाने गोंदे ते सिन्नर रस्त्यावर मोटरसायकलने संपतचा पाठलाग केला व त्यास अन्नपूर्णा हॉटेलजवळ एकट्यास गाठून धारदार तलवारीने संपत याच्या मानेवर, पोटावर, हातावर सपासप वार करून जिवे ठार मारले असल्याबाबत कबुली दिली.

संशयित आरोपीस सिन्नर पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले असून, पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे तपास करत आहेत. नाशिक येथे झालेल्या पत्रकार परिषदेत पोलिस अधीक्षक उमाप यांनी याबाबत माहिती दिली. या कामगिरीत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, सहायक पोलिस निरीक्षक सागर शिंपी, पोलिस हवालदार नवनाथ सानप, पोलिस नाईक प्रीतम लोखंडे, विश्वनाथ काकड, सागर काकड, किरण काकड, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम, भूषण रानडे, तसेच सिन्नर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे, पोलिस नाईक चेतन मोरे, शहाजी शिंदे, पंकज देवकाते, समाधान बोराडे, कृष्णा कोकाटे, अंकुश दराडे, गौरव सानप यांचा सहभाग होता.

हेही वाचा :

The post नाशिक : वडिलांचे अपहरण केल्याच्या संशयातून खून, 22 वर्षीय तरुणाला अटक appeared first on पुढारी.