नाशिक : वणीच्या राम मठात रामजन्मोत्सव साजरा

राम मठात राम जन्मोत्सव,www.pudhari.news

 वणी : पुढारी वृत्तसेवा :

समर्थ रामदास स्वामी यांचे शिष्य उदासी महाराज यांनी स्थापन केलेल्या स्वरूप श्री. राम मंदिर मठात श्री. रामनवमी उत्सव उत्साहात संपन्न झाला. राममंदिरात गेल्या अनेक वर्षांपासून उत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. त्यास अनुसरुन श्री. राम मंदिरात विशेष सजावट करण्यात आली होती. आकर्षक रांगोळी फुलांचे सुशोभिकरण व तत्सम सजावट करण्यात आली होती.

राम लक्ष्मण सितामाई व हनुमान यांच्या मूर्तीना आकर्षक असा पेहराव करण्यात आला होता.  संगमरवरीच्या मूर्तींचे मनमोहक स्वरुपाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मंदिरात गर्दी केली होती. रामजन्मोत्सवा निमित्ताने महाराष्ट्रातील अग्रमानांकीत किर्तनकारांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी बारा वाजेच्या सुमारास रामजन्म् झाला सुशोभीत पाळण्यात प्रतिकात्मक मूर्ती ठेवल्यानंतर महिला भाविकांनी पाळणा गीत गाईले व पाळणा हलवून भाविकांनी दर्शन घेतले.

सोमवारी सुशोभीत पालखीत राम व हनुमानाची मूर्ती ठेवून शहरातील प्रमुख मार्गावरुन मिरवणुक काढण्यात येणार आहे. एकादशीला राम सितेच्या विवाहाचे व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आल्याची माहीती मठाधिपती विनायक चन्द्रात्रे व प्रद्युम्न चंन्द्रात्रे यांनी दिली .परिसरातील व पंचक्रोशीतील भाविकांनी रामजन्मोत्सवास हजेरी लावली.

The post नाशिक : वणीच्या राम मठात रामजन्मोत्सव साजरा appeared first on पुढारी.