नाशिक : वणी परिसरात डोंगर्‍यादेव उत्सवाला प्रारंभ; आदिवासींमध्ये उत्साह

डोंग-यादेव www.pudhari.news

नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा
निसर्गपूजक आदिवासी बांधवांच्या डोंगर्‍यादेव उत्सवाला प्रारंभ झाला. हा उत्सव प्रामुख्याने दिंडोरी, कळवण, सुरगाणा, पेठ, बागलाण तालुक्यांत तसेच साक्री, नंदुरबार, धुळे जिल्ह्यांत साजरा केला जातो. आदिवासी भागात आदिवासींचे कुलदैवत असलेल्या डोंगर्‍यादेव उत्सवाला सुरुवात झाली आहे. निसर्गाच्या कुशीत राहून आदिवासी निसर्गाची पूजा करत आला म्हणून या आदिवासी भागात डोंगर्‍यादेवाला मान दिला जातो. प्रत्येक गावाच्या अगर विभागाच्या प्रथेनुसार आदिवासी डोंगर्‍यादेव हे व्रत तीन किंवा पाच वर्षांनी पाळतात. नियोजित वर्षाच्या मार्गशीर्ष महिन्याच्या अमावास्येला हे व्रत सुरू होते आणि मार्गशीर्ष पौर्णिमेला त्याची सांगता होते. साधारणतः 15 दिवस पाळले जाणारे हे व्रत आदिवासी अलीकडे आठ ते दहा दिवसच पाळतात. ज्या गावात हे व्रत असते, त्या गावातील आदिवासी या व्रताची महिनाभरापासून तयारी करतात.

लोकवर्गणीतून पूजेचे साहित्य
सुरुवातीला दवंडी देऊन प्रत्येक घरातून लोकवर्गणी निश्चित केली जाते आणि आपापल्या सगे, सोयरे, नातेवाइकांना मूळ (आमंत्रण) धाडले (पाठविले) जाते. लोकवर्गणी जमा झाल्यानंतर व्रतासाठी आवश्यक असलेल्या लाल बोकड, लाल कोंबडा, लाल कोंबडी, काळी पाठ (बकरी), मेंढा, फिरंग्या कोंबडा, ढवळा कोंबडा आदी वस्तूंची जमवाजमव करतात. सातव्या दिवशी सायंकाळी म्हणजे मार्गशीर्ष पौर्णिमेला गावातील चोखीखळी ढाळली जाते. भगत मठावरील थोंबाची विधिवत पूजा करून थोंब उपटतो. त्याच्यासोबत व्रतात सामील सर्व माउली, भाया, आबालवृद्ध, ग्रामस्थ डोंगर्‍यादेवाचे गाणे म्हणत गड घेण्यासाठी गौळाच्या (गडाच्या) दिशेने रवाना होतात. रात्री गौळाच्या पायथ्याशी मुक्काम करतात. या जागेला ‘रानखळी’ असे म्हणतात. तेथे पुन्हा थोंब रोवला जातो. दरम्यान गावातील प्रमुख ग्रामस्थ, भगत, मुधानी गौळाजवळ जातात. तेथे स्वच्छता, सारवण करतात. पाच आरत्या, महादर्‍या (मोठा दगडी दिवा), अगरबत्ती लावतात. गौळाच्या गुहेसमोर कोरा शेला (उपरणे) धरतात. तेथे भगत कन्सरा (नागली), तांदळाच्या सव्वाशे पुंजा टाकतो. संपूर्ण पूजाअर्चा झाल्यावर भगत मोठ्याने पाच वेळा लक्ष्मीच्या नावाने ‘लक्ष्मे’ असा आवाज देतो, तोच खाली रानखळीवर थोंबाभोवती बसलेल्या सर्व माउली, भायांचा सूड उठतो (अंगात येते) आणि सर्व माउली घुमू लागता त. त्या गाणे म्हणत नाचू लागतात. पौर्णिमेच्या दिवशी विधिवत पूजेनंतर सांगता होते.

हेही वाचा:

The post नाशिक : वणी परिसरात डोंगर्‍यादेव उत्सवाला प्रारंभ; आदिवासींमध्ये उत्साह appeared first on पुढारी.