नाशिक : वणी शहराला महिला स्वच्छतागृहाचे वावडे

महिला स्वच्छतागृह,www.pudhari.news

वणी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

बाजारपेठेचे मुख्य ठिकाण असलेल्या वणी शहरात मूलभूत सुविधा म्हणून महिलांसाठी स्वच्छतागृह असणे आवश्यक आहे. परंतु वणी ग्रामपंचायत याला अपवाद आहे. शहरात कुठेच महिला स्वच्छतागृह नाही. भगवती शाॅपिंग सेंटरमध्ये महिलांसाठी पुन्हा अद्ययावत प्रसाधनगृह उभारण्याची मागणी महिलांनी केली आहे.

शहरातील बाजारपेठेत पंचक्रोशीतून दररोज हजारो लोक, महिला येतात. परंतु त्यांच्यासाठी शहरात स्वच्छतागृह नाही. शहरातील प्रमुख शिंपी गल्ली, महावीर गल्ली, संताजी चौक, पाण्याच्या टाकीजवळ दुकाने आहेत. परंतु या परिसरात कुठेही महिलांसाठी प्रसाधनगृह नाही. अनेक महिला भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. परंतु प्रसाधनगृहाअभावी त्यांची मोठ्या प्रमाणात कुचंबना होते. भगवती शाॅपिंग सेंटरमधील जिन्याखाली असलेले स्वच्छतागृह बंद करून छोटे गाळे तयार करून मर्जीतील लोकांना देण्यात येत आहे. येथील स्वच्छतागृह ग्रामपंचायतीने काढून टाकले. भाजीपाला मार्केट, शाॅपिंग सेंटरमधील दुकाने यांच्यासाठी शहरात स्वच्छतागृहची व्यवस्था असणे गरजेचे आहे. परंतु गेल्या पंधरा ते वीस वर्षांत ग्रामपंचायत प्रशासनाने दखल घेतली नाही. शाॅपिंग सेंटरमध्ये पुन्हा स्वच्छतागृह उभारण्याची मागणी महिलांनी केली आहे.

बसस्थानक वगळता शहरात कुठेच महिलांसाठी स्वच्छतागृह नाही. काही सार्वजनिक शौचालयही गावाच्या बाहेर आहे, पण तिथे जाणे शक्य होत नाही. मस्जिद चौक येथे भाजीपाला व किराणा दुकाने आहे. बाहेरगावाहून येणाऱ्या महिला व्यावसायिकांना अडचणींचा मोठा सामना करावा लागतो. ग्रामविकास अधिकाऱ्यांनी प्रसाधनगृहाच्या समस्येची गंभीर दखल घेणे क्रमप्राप्त आहे. महिलांसाठी स्वच्छतागृह हा त्यांचा मूलभूत अधिकार असून, त्यांना त्यापासून वंचित ठेवणे त्यांच्यावर अन्याय आहे.

ग्रामपंचायतीचा कानाडोळा

वणी ग्रामपंचायतीमध्ये सतरा सदस्यांपैकी नऊ महिला सदस्य आहेत. गेल्या वीस-पंचवीस वर्षांपासून वणी शहरात महिलांसाठी स्वच्छतागृह नाही याची कोणीही दखल घेतलेली नाही. महिलांच्या समस्या महिलांनी मांडल्या पाहिजे. पण तसे घडताना दिसत नाही. शहरातील ग्रामपंचायतीच्या मालकीच्या अनेक जागा असून, तेथ स्वच्छतागृह उभारणे गरजेचे आहे.

हेही वाचा : 

The post नाशिक : वणी शहराला महिला स्वच्छतागृहाचे वावडे appeared first on पुढारी.