नाशिक : वाघाडी नदीच्या पुराने गोदाघाटावर साचला गाळ; मनपा कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता मोहीम

waghadi www.pudhari.news

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा

गौरी पटांगणाजवळील गोदापात्राला येऊन मिळणाऱ्या वाघाडी (वरुणा) नदीला रविवारी (दि. ८) रात्री अचानक आलेल्या पुरामुळे गोदाघाट परिसरात मोठ्या प्रमाणात गाळ साचला असून, हा परिसर स्वच्छ करण्यासाठी मनपा कर्मचाऱ्यांकडून युद्धपातळीवर मोहीम राबविण्यात आली.

चामरलेणी परिसरात रविवारी दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे या भागातून वाहात येणाऱ्या वाघाडी नदीला रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणात पूर आला होता. चामारलेणी, म्हसरूळ, हिरावाडी, गणेशवाडीमार्गे ही नदी गोदाघाटावरील गौरी पटांगण येथून गोदावरीला मिळते. अचानक आलेल्या या पुरामुळे गौरी पटांगण येथे पार्किंगसाठी उभ्या असलेल्या तीन-चार रिक्षांसह दोन कार या पाण्यात अडकल्या. रिक्षाचालकांना येथील तरुणांच्या मदतीने दोन रिक्षा पुरातून वाचविण्यात यश आले. मात्र, दोन रिक्षांसह व एक कार पुराच्या पाण्यात बुडाली. घटनेची माहिती मिळताच पंचवटी विभागाच्या अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेत बुडालेली वाहने पाण्याबाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. सोमवारी (दि. ८) सकाळी पूर ओसरल्यानंतरही अग्निशमन विभागाने वाहने बाहेर काढण्यासाठी मदतकार्य केले. तसेच पुराच्या पाण्यामुळे गौरी पटांगणासह गोदाघाट परिसरात चिखल, गाळ व कचरा मोठ्या प्रमाणात साचल्याने मनपाच्या आरोग्य विभागाने तातडीने जेसीबी व ट्रॅक्टरच्या सहायाने गाळ उचलून गोदाघाट परिसर स्वच्छता मोहीम राबविली.

हेही वाचा:

The post नाशिक : वाघाडी नदीच्या पुराने गोदाघाटावर साचला गाळ; मनपा कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता मोहीम appeared first on पुढारी.