नाशिक : वाढत्या तापमानाचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज

उष्माघात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

उष्माघाताच्या रुग्णांना तातडीने उपचार मिळण्यासाठी ग्रामीण रुग्णालयांमध्ये खाटांसह स्वतंत्र खोली सज्ज ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार उपजिल्हा रुग्णालये आणि ग्रामीण रुग्णालयांत प्रत्येकी दोन, तर प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रत्येकी एक खाट राखीव ठेवण्यात आला आहे.

खारघर येथे उष्माघातामुळे १३ जणांचा मृत्यू झाला. तसेच राज्यातही उष्माघातामुळे नागरिकांचा बळी गेला आहे. नाशिक जिल्ह्यातदेखील उन्हाचा तडाखा वाढला आहे. त्यामुळे यंदाचा उन्हाळा अधिक उष्ण होण्याच्या शक्यतेने उष्माघाताचे रुग्ण वाढण्याची भीतीही वर्तवली जात आहे. त्यामुळे उष्माघाताच्या रुग्णांवर उपचारासाठी सरकारी रुग्णालयांमध्ये आरोग्य विभागाने प्राथमिक आरोग्य केंद्र ते जिल्हा रुग्णालयांतील सर्वच ठिकाणी राखीव खाटा ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागात शेतकरीवर्गाला तसेच मोलमजुरी करणाऱ्यांना उन्हातान्हात काम करावे लागते. त्यामुळे अशा नागरिकांना उष्माघाताचा धोका संभवण्याची शक्यता अधिक असते. उष्माघाताची लक्षणे असणारे रुग्ण उपचारासाठी आल्यास तातडीने उपचार सुरू करण्यासाठी आइस पॅक, पॅरासिटॅमॉलसारखी औषधे उपलब्ध ठेवण्यात आली आहेत. जिल्ह्यात ११२ प्राथमिक आरोग्य केंद्रे असून, प्रत्येक केंद्रात उष्माघाताच्या रुग्णांसाठी स्वतंत्र खोली आणि त्यामध्ये एक बेड राखीव ठेवण्यात आला आहे. या खोलीत हवा खेळती राहील याची काळजी घेतल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहते यांनी दिली. तर ग्रामीण रुग्णालयांसह उपजिल्हा रुग्णालयांत प्रत्येकी दोन बेड राखीव ठेवण्यात आले आहेत.

जिल्ह्यात उष्माघाताचा एकही रुग्ण आढळलेला नाही. मात्र, रुग्ण उपचारासाठी येण्याची शक्यता गृहीत धरून सरकारी रुग्णालयात प्रत्येकी दोन बेड राखीव ठेवण्याच्या सूचना संबंधित वैद्यकीय अधीक्षक आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. – डॉ. अशोक थोरात, जिल्हा शल्यचिकित्सक.

उष्माघाताची लक्षणे अशी…
थकवा येणे, वारंवार तहान लागणे, अस्वस्थ वाटणे, डोके दुखणे, जिभ कोरडी पडणे, डिहायड्रेशन, रक्तदाब कमी होणे, हृदयाची धडधड वाढणे, त्वचा लाल होणे, बेशुद्ध पडणे, चक्कर येणे, मळमळणे, श्वास घेण्यास त्रास होणे, स्नायूंमध्ये वेदना होणे.

काय काळजी घ्यावी
उष्माघात टाळण्यासाठी नागरिकांनी उन्हात जाऊ नये. घराबाहेर पडताना पाण्याची बाटली सोबत ठेवावी, जास्तीत जास्त पाणी पिले पाहिजे. लिंबू पाणी, द्रव पदार्थांचे सेवन केले पाहिजे. सुती कपडे वापरावे. उन्हापासून संरक्षणासाठी छत्री, टोपी किंवा इतर साधनांचा वापर करावा. आवश्यकता नसल्यास दुपारी १२ ते सायंकाळी ५ यावेळेत घराबाहेर पडणे टाळावे.

हेही वाचा:

The post नाशिक : वाढत्या तापमानाचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज appeared first on पुढारी.