नाशिक : वारसास्थळांना नाशिककर वाहणार श्रद्धांजली, स्मार्टसिटीविरोधात गोदाघाटावर आज आंदोलन

गोदाघाट आंदोलन,www.pudhari.news

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा

रामकुंड व गोदाकाठावर स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने विविध कामे सुरू असून, ती सुरू करण्यापूर्वी वारसास्थळे पुनर्बांधणीचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, इतके महिने उलटूनही अनेक ठिकाणी परिस्थिती ‘जैसे थे’च आहे. याउलट काम करताना अनेक छोट्या मंदिरांना तडे गेले आहेत, तर काही मंदिरे भग्न झाली आहेत. शिवाय सुस्थितीत असलेल्या ६५० वर्षे जुन्या पायऱ्यादेखील तोडल्या गेल्या. त्यामुळे नाशिककरांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात असून, याच वारसास्थळांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शनिवारी (दि. १०) सकाळी ११ ला यशवंतराव महाराज पटांगणावर श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली आहे.

अनेक दिवसांपासून गोदाघाट व परिसरात सुरू असलेल्या कामांमुळे गोदाकाठच्या जनजीवनावर परिणाम झाला आहे. या कामाला होणारा विरोध लक्षात घेत, तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी येथे पाहणी केली होती. त्यावेळी पुरोहित संघासह परिसरातील नागरिकांनी समस्यांचा पाढा वाचला होता.

येथील कामाला विरोध झाल्यानंतर मंदिर विश्वस्त, पुरोहित, गोदाप्रेमी, स्थानिक नागरिक यांची बैठक मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे यांनी स्मार्ट सिटी कार्यालयात घेतली होती. त्यावेळी पायऱ्या पूर्ववत बसवून देणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर या परिसरात पाहणी दौराही झाला होता. असे असताना त्या पायऱ्या अद्याप बसविण्यात आलेल्या नाहीत. येथील छोटी मंदिरे, देव-देवतांच्या मूर्ती आणि पायऱ्यांची जागा भग्नावस्थेत दिसत आहे. त्याचे ओंगळवाणे चित्र या परिसरात येणाऱ्यांना दिसत आहे. पायऱ्या पूर्ववत बसविण्याचे आश्वासन देऊनही त्या बसविण्यास अजूनही मुहूर्त सापडत नाही. उलट, या भागात दगडी फरशा बसविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

गोदापात्रातील दुतोंड्या मारुती मंदिराच्या सांडव्यापासून काँक्रिट काढण्याचे काम करताना येथील सांडवाही काढण्यात आला. काँक्रिट काढल्यानंतर या भागातील यशवंतराव महाराज पटांगणाच्या बाजूने गोदापात्राकडे उतरण्यासाठी असलेल्या पुरातन पायऱ्या ५ मार्च २०२२ रोजी तोडण्यास सुरुवात करण्यात आली होती. या पायऱ्या पुरातन असून त्या नीलकंठेश्वर महादेव मंदिराच्या परिसरात असल्याने येथील वास्तूच्या भागात काही काम करायचे असल्यास, त्याला पुरातत्त्व विभागाच्या परवानगीची आवश्यकता असते. मात्र, अशा प्रकारे कोणतीही परवानगी घेतली गेली नसल्याने तसेच नागरिकांनी विरोध दर्शविल्याने हे काम थांबविण्यात आले.

नाशिककरांच्या जिव्हाळ्याचा आणि धार्मिकतेचा विषय असलेल्या गोदाघाटाला लागलेल्या स्मार्ट सिटी नावाच्या ग्रहणाला बाजूला करावे अथवा शास्त्रीय पद्धतीने प्राचीन वास्तूंचे जतन करावे, या मागणीसाठी स्मार्ट सिटी कंपनीने हत्या केलेल्या वारसा स्थळांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी नाशिककरांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नाशिककरांचा विरोध असताना स्मार्ट सिटी कंपनीकडून रामकुंड व गोदाकाठावर फोडकाम करत नवीन कामे हाती घेण्यात आली आहेत. सुस्थितीतली ही कामे तोडण्यासाठी कडाडून विरोध झाला असताना, कंपनीने वारसास्थळे पुनर्बांधणीचे आश्वासन दिले. त्याला वर्षभराहून अधिक कालावधी उलटला. मात्र, कंपनीने अद्यापही जीर्णोद्धाराचे काम हाती घेतलेले नाही. याउलट निषिद्ध क्षेत्रात अनावश्यक फरशा बसवण्याचे काम सुरू आहे.

– देवांग जानी, गोदाप्रेमी

नाशिककरांच्या प्रमुख मागण्या..!

१) स्मार्ट सिटी कंपनीने तोडलेला श्री गोदावरी नदीपात्रातील देवीचा सांडवा पूर्ववत बांधून द्यावा.

२) यशवंत महाराज पटांगण येथे तोडलेल्या पुरातन दगडी पायऱ्या पुरातन पद्धतीने बसवून द्याव्या.

३) स्मार्ट सिटी कंपनीने तोडलेली श्री गणपतीची मूर्ती विधिवत तयार करून पुन:स्थापित करावी.

४) सांडवा तोडताना छोट्या मंदिरांना भेगा पडलेल्या आहेत, त्याची दुरुस्ती करून द्यावी.

५) गोपिकाबाई तास येथे पायऱ्यांवर कोरीव कासव आहे त्याचे संरक्षण जतन करावे.

६) श्री गोदावरी नदीपात्रातील प्राचीन कुंडातील उर्वरित तळ सिमेंट काँक्रिट तत्काळ काढावे.

७) नदीतील काँक्रिट काढून प्राचीन 17 कुंडांची निर्मिती करून गोदाघाटाला पुनर्वैभव प्राप्त करून द्यावे.

८) गोदाघाट परिसरातील हेरिटेज अस्तित्व अबाधित ठेवून पुढील कामे करावी. या मागण्या पूर्ण करण्याची लेखी हमी नाशिक स्मार्ट सिटी कंपनीने द्यावी.

हेही वाचा :

The post नाशिक : वारसास्थळांना नाशिककर वाहणार श्रद्धांजली, स्मार्टसिटीविरोधात गोदाघाटावर आज आंदोलन appeared first on पुढारी.