नाशिक : वाहनांचा वेग मोजणार्‍या ‘रडार’ला तत्त्वत: मान्यता

वाहनांचा वेग www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
देशात सर्वाधिक अपघातप्रवण क्षेत्र (ब्लॅक स्पॉट) नाशिक ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत असल्याने तेथील अपघात कमी करण्यासाठी पोलिसांनी रडार बसवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार नाशिक ग्रामीण पोलिस ‘कॉम्प्लेक्स ट्रॅफिक कंट्रोल डिव्हाइस’ (सीटीसीडी) बसविणार असून, महामार्गावरील 92 ब्लॅक स्पॉटपैकी महत्त्वाच्या ठिकाणी हे रडार कार्यान्वित होईल. पोलिस महासंचालक कार्यालयाने त्यास तत्त्वत: मान्यता दिली आहे. यामुळे ग्रामीण पोलिसांकडून रडार बसवण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून, त्यामुळे एका मिनिटात सुमारे 60 वाहनांचा वेग पोलिसांना टिपता येणार आहे.

जिल्ह्यात सर्वाधिक अपघात वेगामुळे होत असल्याचा निष्कर्ष समोर आला. त्यामुळे वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी स्पीडगनचा वापर सुरू केला. मात्र, स्पीडगनची मर्यादा कमी पडत असल्याचे लक्षात आले. ग्रामीण पोलिसांच्या वाहतूक शाखेने केलेल्या नोंदीनुसार 2019 पर्यंत महामार्गावर 527 जणांचा मृत्यू झाला होता, तर 2020 ते 2022 या दोन वर्षांत शंभरपेक्षा अधिक जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. दंडात्मक कारवाईदेखील प्रभावी ठरत नसल्याने वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी रडार उपयोगी ठरू शकणार आहे. ग्रामीण पोलिसांनी दोन दिवस प्रायोगिक तत्त्वावर रडारमार्फत वाहनांच्या वेगावर लक्ष ठेवले होते. रडाराआधारे वाहनचालकांना शिस्त लावण्याचा प्रस्ताव महासंचालक कार्यालयाकडे सादर केला होता. त्यास तत्त्वत: मान्यता मिळाल्याने ग्रामीण पोलिसांकडून पुढील कार्यवाही सुरू झाली आहे.

अशी असेल रडार यंत्रणा : मोबाइल स्पीड कॅमेरा एका रडारप्रमाणे काम करेल. महामार्गावरील प्रत्येक वाहनाच्या वेगावर नजर असेल. महामार्गावरील अपघातप्रवण क्षेत्रात रडार असेल. दहा लाख रुपयांचे हे यंत्र भाडेतत्त्वावर घेण्यात येईल. त्याच्या दोन्ही बाजूने एक किलोमीटर क्षेत्रावरील वाहनांच्या वेगावर लक्ष ठेवता येते. वाहनांचे स्कॅनिंग करून त्यांची वेगमर्यादा, विनाहेल्मेट, टोल भरणा, वाहतूक स्थिती व इतर नियमांचे पालन होते किंवा नाही हे तपासले जाईल. त्याचे चित्रीकरणही केले जाईल. नियम मोडलेल्या वाहनाच्या मालकास ई-दंड ठोठाविला जाईल. दंड न भरणार्‍यांचे वाहन नाकाबंदीदरम्यान जप्त केले जाऊ शकेल.

रडारच्या प्रस्तावाला महासंचालक कार्यालयाने तत्त्वत: मंजुरी दिली आहे. ही यंत्रणा चांदवड आणि सिन्नरमध्ये कार्यान्वित केले जाईल. याबाबत प्रात्यक्षिक झाले आहे. राज्यातील हा पहिलाच प्रयोग असेल. – सचिन पाटील, पोलिस अधीक्षक.

स्पीडगनपेक्षा रडार सरस : स्पीडगनमार्फत एका मिनिटात सहा वाहनांचा वेग तपासला जाऊ शकतो. त्यासाठी वाहन स्पीडगनजवळून जाणे अपेक्षित आहे. मात्र, रडारवरून एक मिनिटात साठ वाहनांचा वेग तपासला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे रडार असलेल्या ठिकाणाहून दुतर्फा एक किमी लांबीपर्यंत वाहनांचा वेग तपासला जातो. त्यामुळे स्पीडगनपेक्षा रडार सरस ठरत असल्याचे दिसते.

हेही वाचा:

The post नाशिक : वाहनांचा वेग मोजणार्‍या ‘रडार’ला तत्त्वत: मान्यता appeared first on पुढारी.