नाशिक : वित्त आयोगाच्या अनुदानासाठी महापालिका अपात्र ठरण्याची भीती

नाशिक महानगरपालिका www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मालमत्ता करवसुलीच्या महसुलात वाढ होत नसल्याने उत्पन्न वाढीसाठी मनपाकडून प्रयत्न होत आहेत, तर दुसरीकडे मालमत्ता कराच्या उत्पन्नात 25 ते 30 टक्के इतकी वाढ न झाल्यास केंद्राच्या 15 व्या वित्त आयोगाच्या अनुदानासाठी मनपा अपात्र ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आर्थिक कोंडीचा सामना करणार्‍या मनपाला उत्पन्न वाढविण्याकरिता तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

मनपाच्या मालमत्ता कराची सुमारे 350 कोटी इतकी थकबाकी आहे. थकबाकी कमी होण्याऐवजी त्यात सातत्याने वाढच होत असल्याने हा प्रकार मनपाची डोकेदुखी ठरली आहे. महापालिका प्रशासनाने थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. राज्य शासनाच्या नगर परिषद प्रशासन संचालनालयाकडून दोन दिवसांपूर्वी 15व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशींबाबतचे पत्र प्राप्त झाले आहे. राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी 2023-24 या आर्थिक वर्षाचे अनुदान मिळण्यासाठी गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत चालू आर्थिक वर्षाच्या मालमत्ता कराच्या उत्पन्नात वाढ अनिवार्य असल्याची अट शासनाने घालून दिली आहे. नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी उत्पन्न स्रोतांमध्ये वाढ करणे आवश्यक असल्याने 15व्या वित्त आयोगाच्या शिफारशींनुसार अनुदान प्राप्त करण्यासाठी विविध अटी व शर्ती निर्धारित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार 2023-24 च्या 15 व्या वित्त आयोगाच्या अनुदानासाठी महापालिकांना मालमत्ता कर प्रणालीमध्ये सुधारणा करणे गरजेचे असल्याचे शासनाच्या पत्रात म्हटले आहे. मालमत्ता करवसुलीची 2021-22 या आर्थिक वर्षाची आकडेवारी तसेच 2022-23 मधील निर्धारित उद्दिष्ट यामधील आकडेवारीत वाढ अपेक्षित आहे. राज्याच्या स्थूल उत्पन्नातील वाढ लक्षात घेता, सद्यस्थितीत नागरी स्थानिक संस्थांनी किमान 25 ते 30 टक्के निव्वळ वाढ करणे बंधनकारक आहे. अन्यथा 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये 15व्या वित्त आयोगाचे अनुदान प्राप्त करण्यासाठी अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.

मालमत्ता कराच्या दरात मनपाने याआधीच वाढ केलेली असल्याने पुन्हा दरवाढ करणे शक्य नाही. तूर्तास नवीन मिळकतींना मालमत्ता कर लागू करण्याची प्रक्रिया सुरू असून, त्याआधारे मालमत्ता करामध्ये वाढ करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. – डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, आयुक्त, मनपा.

हेही वाचा:

The post नाशिक : वित्त आयोगाच्या अनुदानासाठी महापालिका अपात्र ठरण्याची भीती appeared first on पुढारी.