नाशिक : विद्यार्थी अन् गुरुजींचा बसेना ताळमेळ

समस्यांची शाळा www.pudhari.news

नाशिक : वैभव कातकाडे
शिक्षण हे वाघिणीचे दूध समजले जाते. मात्र, शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभारामुळे विद्यार्थी याच दुधाला पारखे झाले आहेत. जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांची संख्या जरी मुबलक असली तरीदेखील काही तालुक्यांत अतिरिक्त, तर काही तालुक्यांत शिक्षकांची संख्या नगण्य बघायला मिळत आहे. याचा परिणाम जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांवर होत आहे.

याबाबत शिक्षण विभागानेच तातडीने काही पावले उचलायला हवी. विद्यार्थी आणि गुरुजींचा समतोल साधला जाणार का? हादेखील प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. जिल्ह्यातील 15 तालुक्यांमधील 3 हजार 266 शाळांमध्ये एकूण 2 लाख 78 हजार 337 विद्यार्थी आजघडीला जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेत आहेत. त्यांना 10 हजार 604 शिक्षक शिकवत आहेत. केंद्र सरकारने घोषित केल्यानुसार 30 विद्यार्थ्यांमागे 1 शिक्षक असे प्रमाण हवे. जिल्ह्यात एकूण विद्यार्थ्यांमागे हे प्रमाण योग्य जरी दिसत असले तरी तालुक्यांचा विचार करता काही तालुक्यांमध्ये अतिरिक्त शिक्षक, तर काही तालुक्यांमध्ये शिक्षकांची उदासीनता दिसून येत आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचा ठराविक तालुक्यांमध्ये बदली करून राहण्याचे प्रमाणदेखील यामुळे समोर येत आहे.

शिक्षकांच्या समायोजनातच असमन्वय
विकसित शहरालगतच्या तालुक्यांमध्ये शिक्षकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तर पेठ, सुरगाणा यांसारख्या तालुक्यामध्ये शाळा जास्त, तर शिक्षक संख्या कमी प्रमाणात बघायला मिळत आहे. देवळा तालुक्यात 9 हजार 190 विद्यार्थ्यांमागे 393 शिक्षक आहेत, तर नाशिक तालुक्यात 14 हजार 305 विद्यार्थ्यांमागे अवघे 496 शिक्षक आहेत. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या शिक्षकांचे समायोजन करण्यात येत असते. मात्र, शिक्षणाधिकारीच प्रभारी असल्याने आता हे समायोजन कसे होणार हादेखील प्रश्न गंभीर आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : विद्यार्थी अन् गुरुजींचा बसेना ताळमेळ appeared first on पुढारी.