Site icon

नाशिक : विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास; सुरक्षित प्रवासाचा प्रश्न ऐरणीवर

नाशिक : नितीन रणशूर
कोरोनाच्या दोन वर्षांच्या प्रादुर्भावानंतर शाळा-महाविद्यालये पूर्वपदावर आले आहेत. वर्ग नियमित भरू लागल्याने विद्यार्थिसंख्येतही लक्षणीय वाढ झाली आहे. त्यासोबतच पूर्वीप्रमाणेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अप्रशिक्षित चालक आणि असुरक्षित वाहनांतून शेकडो शालेय विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे. परिवहन विभागासह पोलिसांचे शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीकडे दुर्लक्ष होत असून, रिक्षाचालकांच्या मनमानीमुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला आहे.

शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसंदर्भात परिवहन विभागाचे कडक नियम आहेत. या नियमांच्या अधीन राहूनच विद्यार्थ्यांची वाहतूक बंधनकारक आहे. मात्र, शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणारे या नियमांना केराची टोपली दाखवत धोकादायक प्रवास करताना सर्रास दिसतात. स्कूलबससोबत शालेय विद्यार्थी वाहतुकीचा परवाना नसलेली वाहनेही विद्यार्थ्यांची वाहतूक करतात. अनेक वाहनांवरील चालक तर अप्रशिक्षित असतात. क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी कोंबून नेतात. विद्यार्थ्यांना बसायला जागाही नसल्याचे चित्र बघावयास मिळते.
शहरासह उपनगरांमधील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी शेकडो वाहने शहरातील वेगवेगळ्या भागांतून धावत असतात. यात टेम्पो ट्रॅव्हलर, मिनीबस, टाटा मॅजिक व्हॅन, ऑटो रिक्षा आदी वाहनांचा समावेश आहे. या वाहनांतून अक्षरश: कोंबून विद्यार्थ्यांची शाळेत ने-आण केली जाते. विशेषत: रिक्षांमधून शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास अतिशय धोकादायक आहे. एका रिक्षातून चक्क डझनभर विद्यार्थी नेले जातात. रिक्षांमध्ये चालकाच्या शेजारी विद्यार्थी बसवून वाहतूक केली जाते. त्यातच बहुतांश वाहने नादुरुस्त असतानाही रस्त्यावर धावतात. ही वाहने अपघातांना आमंत्रण देणारी ठरत आहेत.

शालेय वाहतूकदारांची मनमानी…
विद्यार्थी प्रवेशासाठी शाळा व्यवस्थापनाकडून पालकांना वेगवेगळ्या स्वरूपाची आमिषे दाखविली जातात. त्यात घरापासून शाळेपर्यंत स्कूलबसची सुविधा असल्याचे सांगितले जाते. बहुतांश शाळांच्या स्कूलबसेस असल्या तरी, त्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शाळा व्यवस्थापन तसेच शासकीय यंत्रणांचा वचक न राहिल्याने शालेय वाहतूकदारांची मनमानी वाढली आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास; सुरक्षित प्रवासाचा प्रश्न ऐरणीवर appeared first on पुढारी.

Exit mobile version