नाशिक : विद्यार्थ्यांची दररोज मृत्यूशी झुंज ; सावरपाड्यातील भीषण वास्तव

सावरपाडा नाशिक,www.pudhari.news

सुरगाणा (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
सुरगाणा तालुक्यातील सावरपाडा येथील केटी बंधार्‍यावरून पुराचे पाणी जात असल्याने येथील विद्यार्थ्यांना पुराच्या पाण्यातून शाळेचा प्रवास करावा लागत आहे. केटी बंधार्‍यावरून पुराचे पाणी वाहात असल्याने विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका निर्माण झालेला आहे. यानिमित्ताने इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, पेठ आदिवासीबहुल तालुक्यांतील असुविधांचे भीषण वास्तव समोर आले आहे.

सुरगाणा तालुक्यात पहिल्याच पावसात रस्ते खचले, पूल पाण्याखाली गेले, तर अनेक गावांचा संपर्क तुटला. अलंगुण गावात पुराचे पाणी घुसले. अनेक भागांत आजही पूरपरिस्थिती असून, नागरिकांना ये-जा करण्यासाठी पुरातूनच चालत जावे लागत आहे. सुरगाणा तालुक्यातील भेगू सावरपाडा येथील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्या – येण्यासाठी केटीवेअरवरून प्रवास करावा लागतो. या ठिकाणी कळमणे, भेगू, सावरपाडा, मदळपाडा, खिरमाणी अशी गावे असून, त्यांचा इतर गावांशी संपर्क तुटला आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी येथे पूल होणे आवश्यक आहे. पूल नसल्याने विद्यार्थ्यांना दररोज मृत्यूशी झुंज द्यावी लागत आहे. त्यामुळे शासनाने योग्य ती दखल घेऊन या ठिकाणी पूल बांधावा तसेच शाळेतील विद्यार्थ्यांसाठी योग्य उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

यंदाच्या पावसाळ्यात सुरगाणा तालुक्याला अत्यंत भीषण परिस्थितीला सामोरे जावे लागले. अनेक भागांत पूर आल्याने संपर्क तुटला, आरोग्यव्यवस्था खोळंबली. पिण्याच्या पाण्याचे तीन तेरा वाजले. आता शाळा सुरू झाली, तर विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी पूलच नाही. त्यामुळे संबंधित तालुका, जिल्हा प्रशासन पायाभूत सुविधांसाठी नेमके काय करतेय, असा संतप्त सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. लोकप्रतिनिधी मतांचा जोगवा मागण्याशिवाय स्थानिक पातळीवर कामे करतात का? असाही प्रश्न या निमित्ताने होत आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : विद्यार्थ्यांची दररोज मृत्यूशी झुंज ; सावरपाड्यातील भीषण वास्तव appeared first on पुढारी.