नाशिक : विभागातील एकवीस तहसीलदारांमध्ये खांदेपालट

तहसीलदार www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महसूल विभागात उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांनंतर तहसीलदारांमध्ये खांदेपालट करण्यात आला आहे. नाशिक विभागातील २१ तहसीलदारांच्या बदल्यांम‌ध्ये नाशिक तहसीलदार अनिल दौंडे, जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल चिटणीस राजेंद्र नजन, इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे आदींचा समावेश आहे.

राज्य शासनाने दोनच दिवसांपूर्वी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. त्यापाठोपाठ बुधवारी (दि. १२) रात्री उशिरा तहसीलदारांच्या बदल्यांचे आदेश काढले. नाशिकचे तहसीलदार दौंडे यांची बदली झाली असून, ते सध्या नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांच्या जागी नाशिकराेड येथील विभागीय कार्यालयातील तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांची नियुक्ती झाली आहे. त्यांच्या जागी राहत्याचे तहसीलदार कुंदन हिरे यांची बदली झाली. महसूल चिटणीस नजन यांच्या जागेवर कासुळे यांची नियुक्ती केली असून नजन यांना अद्याप अन्य नियुक्ती देण्यात आलेली नाही.

त्र्यंबकेश्वरचे तहसीलदार दीपक गिरासे यांची शहादा तहसीलदारपदी बदली करण्यात आली. शहादाचे तहसीलदार मिलिंद कुलकर्णी यांची नाशिकरोड येथील महसूल प्रबोधिनीत बदली झाली. प्रबोधिनीच्या तहसीलदार मंजुषा घाटगे यांना नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेत नेमणूक मिळाली आहे. बागलाणचे तहसीलदार जितेंद्र इंगळे यांना कागल (जि. कोल्हापूर) येथे नियुक्ती देण्यात आली. नगर जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य विभागाच्या तहसीलदार वैशाली आव्हाड यांना जिल्हाधिकारी कार्यालयात कुळकायदा विभागात नियुक्ती मिळाली आहे. येथील तहसीलदार पल्लवी जगताप या नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. मालेगावचे तत्कालीन तहसीलदार चंद्रजित राजपूत यांची राहुरी तहसीलदारपदी बदली करण्यात आली. पेठ तहसीलदारपदी विभागीय आयुक्तालयातील अनिल पुरे तसेच शिरपूरचे तहसीलदार आबा महाजन यांना येवल्यात नेमणूक मिळाली. दरम्यान, पेठ तहसीलदार संदीपकुमार भोसले व येवला तहसीलदार प्रमोद हिले नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. संगमनेर तहसीलदार अमोल निकम यांची जिल्हाधिकारी कार्यालयातील यूएलसी विभागात बदली करण्यात आली आहे. बदली झालेल्या अधिकाऱ्यांना तातडीने नियुक्तीच्या ठिकाणी रुजू होण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.

हेही वाचा:

The post नाशिक : विभागातील एकवीस तहसीलदारांमध्ये खांदेपालट appeared first on पुढारी.