Site icon

नाशिक विभागात २९०४ वाड्या-वस्त्यांची बदलली नावे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

समाजकल्याण विभागाने राज्यातील रस्ते, वाड्या-वस्त्यांची जातिवाचक नावे बदलून त्यांना महापुरुषांची व लोकशाही मूल्यांशी निगडित नावे देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने नाशिक विभागात २९०४ जातिवाचक रस्ते, वाड्या, वस्त्यांची नावे बदलली आहेत. विभागाचे काम समाधानकारक असल्याची माहिती विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिली आहे.

विभागीय आयुक्त कार्यालयातील समिती कक्षात नुकतीच विभागीय दक्षता व नियंत्रण समिती, गावे, वस्त्या व रस्त्यांची जातिवाचक नावे बदलून नवीन नावे देण्याबाबत विभागीय समितीची बैठक व तृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण आणि कल्याण मंडळ व इतर आनुषंगिक विषयांची आढावा बैठक झाली. त्यावेळी आयुक्त गमे बोलत होते. बैठकीस नाशिक विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील, विभागातील सर्व जिल्हाधिकारी, सर्व पोलिस आयुक्त व अधीक्षक, सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपआयुक्त माधव वाघ यांच्यासह विविध यंत्रणांचे कार्यालयप्रमुख उपस्थित होते.

नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांतील २९०४ जातिवाचक नावे बदलली आहेत. त्यामध्ये महानगरपालिका क्षेत्रातील १६९, नगरपालिका क्षेत्रातील २६६ व ग्रामपंचायत क्षेत्रातील (ग्रामीण) २४६९ याप्रमाणे नावे बदलली. त्यामुळे सामाजिक बदलांची सुरुवात झाल्याचे गमे यांनी सांगितले. दरम्यान, विभागीय दक्षता व नियंत्रण समितीच्या गत तीन महिन्यांच्या कालावधीत घडलेल्या गुन्ह्यांच्या तपशिलाचा जिल्हानिहाय आढावा घेण्यात आला. अत्याचारग्रस्तांना दिलेले अर्थसहाय्य व त्यासंदर्भात केलेल्या उपाययोजनांबाबत सर्व यंत्रणांनी दक्षता घेणे आवश्यक असल्याचे गमे यांनी सांगितले.

तृतीयपंथीयांना प्रशिक्षण

तृतीयपंथी कल्याण समितीच्या बैठकीत तृतीयपंथीयांना कौशल्यावर आधारित प्रशिक्षण देण्यासाठी उपाययोजना कराव्यात. तसेच त्यांच्या ओळखपत्र वाटपासाठी शिबिरे आयोजित करण्याचे निर्देश गमे यांनी दिले. अंधश्रद्धा निर्मूलन व जादूटोणा विरोधी कायद्याच्या अनुषंगाने समाजकल्याण विभागाने व्यापक स्तरावर जनजागृती माेहीम हाती घ्यावी. जास्तीत-जास्त समाजघटकांचा त्यात समावेश करून जनजागृती होणे आवश्यक असल्याचे गमे यांनी सांगितले.

हेही वाचा:

The post नाशिक विभागात २९०४ वाड्या-वस्त्यांची बदलली नावे appeared first on पुढारी.

Exit mobile version