नाशिक : विभागीय अधिकाऱ्यांकडून दुसऱ्या दिवशीही कारवाईचा फार्स

नाशिक : अनधिकृत बॅनर,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा 

मनपा आयुक्तांनी अनधिकृत होर्डिंग, बॅनर तसेच फलक हटविण्यासंदर्भात दिलेल्या आदेशानंतर दुसऱ्या दिवशी जागे झालेल्या अतिक्रमण निर्मूलन विभाग तसेच विभागीय अधिकाऱ्यांनी थातूरमातूर कारवाई करत हाताच्या बोटावर मोजता येतील इतके बोर्ड ताब्यात घेत कारवाईचा फार्स उभा केला.

दरम्यान, नाशिक शहरासह उपनगर परिसरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत होर्डिंग उभारलेले निदर्शनास येत असूनही मनपाच्या अतिक्रमण विभाग तसेच विभागीय अधिकाऱ्यांना बॅनर, फलक आणि होर्डिंग दिसू नये, याविषयी आश्चर्य वाटते. मनपा आयुक्तांनी अनधिकृत होर्डिंग हटविण्यासाठी संबंधितांना १४ डिसेंबरपर्यंतची मुदत दिली होती. त्यानंतर मात्र मनपाकडून फलक, बॅनर जप्त करून दंडात्मक कारवाईबरोबरच गुन्हे दाखल करण्याचा इशारा देण्यात आला होता. मुदत संपल्यानंतर महापालिकेने कारवाई तर केली नाहीच उलट संबंधित किती संस्था तसेच नागरिकांनी स्वत:हून होर्डिंग, फलक हटविले याची माहितीदेखील अधिकाऱ्यांकडे नाही. दुसऱ्या दिवशी मोहिमेत पंचवटी विभागातील मखमलाबाद परिसरातील तीन जाहिरात बोर्ड, १४ स्टॅण्ड बोर्ड, दोन होर्डिंग आणि पोलवर लावलेले दोन बॅनर उतरविण्यात आले. तर पूर्व विभागात पाच स्टॅण्ड बोर्डासह पाच प्लास्टिक कॅरेट, एक स्टॅण्ड काटा व एक पीयूसी पाइप जप्त करण्यात आला. राजसारथी, गुरू गाेविंद सिंग कॉलेज या भागात ही कामगिरी करण्यात आली.

नाशिकरोड, सातपूर, सिडको आणि पश्चिम विभागात संबंधित विभागीय अधिकाऱ्यांना आणि अतिक्रमण विभागाला एकही बॅनर आढळून आले नाही. यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी केवळ हातावर हात धरून बसणेच पसंत केले.

दोन दिवसांत ५६ बॅनर्स हटविले

मनपा अतिक्रमण विभागाने सहा विभागांत दोन दिवसांत एकूण ५६ बॅनर्स, फलक तसेच स्टिकर आणि होर्डिंग्ज हटविल्याचा दावा केला आहे. सातपूर विभागात अवघे एक बॅनर जप्त केले. तर नाशिक पूर्व विभागात १८, पश्चिम विभागात ११, पंचवटी विभागात १०, सिडको विभागात आठ, नाशिकरोड विभागात आठ बॅनर्स, फलक हटविण्यात आल्याचे अतिक्रमण विभागाच्या उपआयुक्त करुणा डहाळे यांनी कळविले आहे.

 हेही वाचा :

The post नाशिक : विभागीय अधिकाऱ्यांकडून दुसऱ्या दिवशीही कारवाईचा फार्स appeared first on पुढारी.