Site icon

नाशिक : विमा दाव्याबाबत फसवणूक; महिलेची मुख्यमंत्री सचिवालयाकडे तक्रार

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

घर घेताना काढलेल्या विम्याचा दावा कंपनीने फसवणूक करून नामंजूर केला. संबधित महिलेने एचडीएफसी (लाईफ) बँकेच्या विमा विभागा विरोधात थेट मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाकडे लेखी तक्रार करून न्याय देण्याची मागणी केली आहे. न्याय न मिळाल्यास पाच वर्षाच्या मुलासह एचडीएफसी लाईफच्या विरोधात फसवणूकीमुळे उपोषणाचा इशाराही महिलेने दिला आहे.

हर्षल दाभणे (रा. सिन्नर) यांनी एचडीएफसी बँकेकडून २४ लाख ७० हजार रुपये कर्ज घेऊन घर खरेदी केले आहे. मात्र, गेल्या आठ महिन्यापूर्वीच त्यांचे निधन झाले. कर्ज मंजूर करताना बँकेच्या विमा विभागाने त्यांचा विमाही उतरविला होता. भविष्यात दाभणे यांच्या बाबतीत काही अप्रिय घटना घडल्यास विम्यातून घराचे उर्वरित कर्ज फेडता येईल हा त्यामागचा हेतू होता. दाभणे यांच्या पत्नी दीपाली दाभणे यांनी पतीच्या निधनासंदर्भात विमा विभागाला माहिती कळवली. त्यानंतर संबंधित अधिकारी डॅनिअल बेस यांनी पतीच्या निधनापूर्वी कुठे उपचार घेत असल्यास तशी कागदपत्रे सादर करण्याची सूचना केली. पण निधनापूर्वी पतीला कोणताही गंभीर आजार नसल्याने उपचार घेण्याचा प्रश्नच नव्हता त्यामुळे कागदपत्रे नाहीत, असे दीपाली दाभणे यांनी संबंधित अधिकारी यांना सांगितले. त्यावर संबंधित अधिकाऱ्याने कागदपत्र दिली तरच दावा मंजूर करता येईल असे, सांगितले. दीपाली दाभणे यांनी परिचित डॉक्टरकडून कागदपत्रे मिळवत ती विमा विभागाला सुपूर्त केली. मात्र काही दिवसांनी दावा नामंजूर करण्यात आल्याचे पत्र त्यांना पाठवण्यात आले. त्यामुळे दाभणे नैराश्यात गेल्या असून त्यांनी थेट मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाकडे धाव घेत बँकेच्या विमा विभागाविरोधात तक्रार दाखल केली. घरातील कर्ता पुरुषच गेल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच विमा दावा नामंजूर केल्याने घराचे हफ्ते भरण्यासाठी बँकेकडून तगादा सुरु आहे. पतीच्या निधनानंतर आर्थिक विवंचनेत असल्याने विमा दावा मंजूर करून द्यावा, अशी विनंतीही त्यांनी केली आहे. तसे न झाल्यास बँकेच्या कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. जोपर्यंत विमा दाव्याचा प्रश्न निकाली निघत नाही, तोपर्यंत हफ्ते स्थगित करण्यात यावेत, अशी विनंती त्यांनी केली आहे.

विमा उतरविण्यास पात्र
हर्षल दाभणे यांचा विमा एच डी एफ सी लाईफ या बँकेने उतरविला. त्यावेळी कोणताही आजार नव्हता, असे स्पष्ट होते. म्हणजे व्याधीमुक्त असल्यानेच विमा उतरविण्यास ते पात्र ठरले, हेही स्पष्ट होते. तरीही दावा फेटाळण्यात आल्याने दीपाली दाभणे यांनी विमा अधिकाऱ्यांच्या हेतूविषयी शंका उपस्थित करुन फसवणूक झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : विमा दाव्याबाबत फसवणूक; महिलेची मुख्यमंत्री सचिवालयाकडे तक्रार appeared first on पुढारी.

Exit mobile version