नाशिक : वीज कनेक्शन तोडल्यास कायदा हातात घेऊ; विद्युत महामंडळाला इशारा

दिंडोरी www.pudhari.news

दिंडोरी : पुढारी वृत्तसेवा

अतिवृष्टीमुळे हातची खरिपाची पिके गेली. संपूर्ण राज्यात ओला दुष्काळ पडला होता. शेतकरी उध्वस्त झाला असून आता रब्बीचा हंगाम सुरू झाला आहे. शेतकरी कसाबसा उभा राहण्याचा प्रयत्न करतो आहे. अशा काळामध्ये वीज बिले थकली म्हणून वीज रोहित्र बंद करण्याचा घाट विद्युत महामंडळाने घातला आहे. राज्यांमधील अनेक वीजरोहित्र बंद केली आहेत. रब्बीच्या हंगामावरती असे सरकारचे वागणे हे असंवेदनशीलतेचे लक्षण असून सरकारच्या काळजातली मानवता पूर्णत: आटली आहे. हेच या कृतीतून दिसून येते. परंतु शेतकऱ्यांची व्यथित अवस्था पाहून शेतकरी देशोधडीला लागत असेल तर स्वाभिमानी शेतकरी संघटना शांतपणे बघत बसणार नाही .कायदा हातात घेऊन आम्ही प्रत्युत्तर देऊ असा इशारा वीज रोहित्र तोडण्यावरून संतप्त झालेल्या स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी विद्युत महामंडळाला दिला आहे.

या यावर्षीची शेतकऱ्यांची खरी परिस्थिती समजून घेऊन शासनाने शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज आहे. परंतु राजकीय चिखलफेक करण्यामध्येच राज्यकर्ते आणि विरोधक दंग आहे. कोण कोणाला काय म्हटलं यावरच प्रसारमाध्यम लक्ष ठेवून आहे. परंतु या देशातला शेतकरी वंचित झाला आहे. खते-औषधांच्या किमती वाढल्यात. मजुरीचे भाव वाढले. पेट्रोल डिझेलचे भाव वाढले. नव्या तंत्रज्ञानाचा वापर करताना वापरत असणाऱ्या यंत्रसामुग्रीचा खर्च वाढला. या सर्व चक्रव्युव्हामध्ये शेती करणे कठीण झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून थोडीफार वीजबिले थकली असतील तर त्यांचे विजेचे कनेक्शन तोडणे चुकीचे आहे.  ओला दुष्काळ जाहीर करून संपूर्ण विज बिले व पीक कर्ज माफ करायला हवे. सरकारने उपाययोजना करायचे सोडून सरकार मात्र शेतकऱ्यांच्या जखमेवरती मीठ चोळत आहे. छत्रपती शिवरायांवरून महाराष्ट्रात वाद सुरू आहे. सर्वच छत्रपती शिवरायांना आदर्श मानतात. पण शिवरायांनी शेतकऱ्यांच्या बाबतीत घेतलेले भूमिका मात्र आजचे राज्यकर्ते विसरलेत. शिवरायांचे नाव घेऊन राजकारण करायचं. बळीराजाचं नाव घेऊन राजकारण करायचं. पण संकटामध्ये शेतकऱ्याच्या अजून जखमेवर मीठ चोळायचं. हे सरकारचं धोरण झालं आहे. पण  आता शांत बसून बघणार नाही. असा इशारा जगताप यांनी राज्यसरकारला दिला आहे.

शेतकऱ्यांनी सुद्धा राज्यकर्त्यांच्या भूलथापांना बळी न पडता आता संघटित झालं पाहिजे. एखादा शेतकरी अडचणीत असेल तर सर्व गावाने त्याच्या पाठीशी खंबीर पणे उभं राहिलं पाहिजे. कारण आज तो जात्यात तर आपण सुपात आहे. उद्या आपलाही नंबर लागेल. म्हणून कोणीही रोहित्र बंद करायला आलं तर लोकशाही मार्गाने सर्वांनी एकत्रीत येऊन मार्गाने विरोध करा. – संदीप जगताप, प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना.

हेही वाचा:

The post नाशिक : वीज कनेक्शन तोडल्यास कायदा हातात घेऊ; विद्युत महामंडळाला इशारा appeared first on पुढारी.