नाशिक : वृद्धेच्या खुनप्रकरणी एकास आजन्म कारावासाची शिक्षा 

न्यायालय www.pudhari.news

  नाशिक, निफाड : प्रतिनिधी 

नातेवाईकाच्या मुलीस काहितरी केल्याच्या संशयाने हातात कुर्हाड घेऊन घरात प्रवेश करत इंदुबाई शंकर नाईकवाडे या सत्तर वर्षीय वृद्धेला जीवे ठार मारल्याप्रकरणी रायते ता. येवला येथील कृष्णा अशोक वाघ ऊर्फ दाद्या यास निफाडचे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश पी. डी दिग्रसकर यांनी आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

येवला शहर पोलिस स्टेशनला याबाबत फिर्यादी मंदाबाई नाईकवाडे यांनी दि. ४ ऑगस्ट २०१८ रोजी तक्रार दिली होती की, भाचीच्या घरात सासु इंदुबाई शंकर नाईकवाडे बसलेले असतांना कृष्णा अशोक वाघ ऊर्फ दाद्या हा घराच्या उघड्या दरवाजातून हातात कुर्हाड घेऊन आत आला व सासू  इंदुबाई शंकर नाईकवाडे यांच्यावर संशय घेऊन तू मामाच्या मुलीस काहितरी केले व मारले असे म्हणत डोक्यात कुर्हाड घातली व इतर साक्षीदारांना बाजुला लोटत पलायन केले. यात सासु इंदुबाई शंकर नाईकवाडे यांचा मृत्यू झाला यावरुन येवला शहर पोलिस स्टेशनला भादवि कलम ३०२,५०४ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला होता.

कृष्णा अशोक वाघ ऊर्फ दाद्या यास अटक करण्यात आली. तपास अधिकारी पोलिस निरिक्षक एन आर नागदरे यांनी तपास करुन आरोपपत्र निफाड जिल्हा व सत्र न्यायालयात पाठविले. या खटल्यात सहायक जिल्हा सरकारी वकिल अॅड आर. एल कापसे यांनी फिर्यादी तपास अधिकारी तसेच प्रत्यक्षदर्शी अशा एकुण दहा साक्षीदारांची साक्ष नोंदवत प्रभावी युक्तीवाद केला. पैरवी अधिकारी पोलिस नाईक विकास कराड यांनी कामकाजात मदत केली. न्यायालयासमोर आलेल्या पुराव्यावरुन  कृष्णा अशोक वाघ ऊर्फ दाद्या यास दोषी धरत भादवि कलम ३०२ अन्वये आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

The post नाशिक : वृद्धेच्या खुनप्रकरणी एकास आजन्म कारावासाची शिक्षा  appeared first on पुढारी.