नाशिक : वैद्यकीयसाठी यंदापासूनच प्रवेश – पालकमंत्री दादा भुसे

दादा भुसे,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिकसाठी महत्त्वपूर्ण ठरणार्‍या वैद्यकीय महाविद्यालयासाठी यंदापासूनच प्रवेशप्रक्रिया राबविली जाणार असून, आवश्यक बाबींची पूर्तता तत्काळ करण्यात येणार असल्याची माहिती नाशिकचे पालकमंत्री तथा बंदरे व खनिकर्ममंत्री दादा भुसे यांनी नाशिक येथे दिली.

महाराष्ट्र शासनाने नाशिक येथे महाविद्यालय साकारण्याचे घोषित केले होते. त्यानुसार त्याबाबतची कार्यवाही शासनस्तरावरून सुरू झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून यंदापासून वैद्यकीय प्रवेशप्रक्रिया राबविली जाणार असल्याचे ना. भुसे यांनी सांगितले. जिल्ह्यात आवश्यक त्या ठिकाणी वळणयोजना राबवून अडविलेले पाणी दुष्काळी भागासाठी उपयोगात आणले जाणार असल्याचे सांगत सुरत – चेन्नई आणि नाशिक – पुणे रेल्वेमार्गाच्या कामांना येत्या काळात चालना दिली जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले. नाशिक शहर तसेच जिल्ह्यातील हुतात्मा स्मारकांची दुरुस्ती करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. योग्य दुरुस्ती झालेल्या स्मारकांमध्ये अभ्यासिका व वाचनालय उभारण्याचा मानस असल्याचे ना. भुसे यांनी सांगितले. जिल्ह्यात उद्योगवाढीस लागण्याच्या दृष्टीने उद्योजकांना आवश्यक त्या सुविधांसह जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना प्रशासनाला करण्यात आल्या आहेत. अनेक ठिकाणी मनपा आणि इतरही प्राधिकरण उद्योजकांकडून सारखाच कर आकारत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यानुसार एकच कर आकारला जावा, याबाबत संबंधितांना सूचना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

‘रोहयो’तून शाळांची दुरुस्ती : ग्रामीण भागातील नागरिकांना अधिकाधिक रोजगार निर्माण होण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी संरक्षक भिंत उभारणे, वर्गखोल्यांची दुरुस्ती तसेच आवश्यक त्या ठिकाणी नवीन शाळाखोल्यांचे बांधकाम हे रोजगार हमी योजनेतून करण्यात येणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय ना. दादा भुसे यांनी जाहीर केला.

खनिकर्म गैरप्रकाराची लवकरच चौकशी :
नाशिक जिल्ह्यात तसेच त्र्यंबक येथे डोंगर पोखरणे आणि गौण खनिज तसेच खनिकर्माच्या कामात झालेल्या गैरप्रकारांची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांना देण्यात येणार असून, या प्रकारात चुकीचे काम करणार्‍यांची गय केली जाणार नसल्याचा इशारा ना. भुसे यांनी दिला. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी दत्तप्रसाद नडे यांचे अधिकार काढून घेण्याबरोबरच जिल्ह्यातील जवळपास 21 खाणपट्ट्यांना सील ठोकले आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : वैद्यकीयसाठी यंदापासूनच प्रवेश - पालकमंत्री दादा भुसे appeared first on पुढारी.