नाशिक : वैद्यकीय अधिकाऱ्यांना भोवला हलगर्जीपणा ; एकाला ‘कारणे दाखवा’, तर एकाची…

Doctor

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महाशिवरात्रीच्या दिवशी येवला तालुक्यातील पन्हाळपाटी गावातील प्रगती वाघ (१७) या बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा मृत्यू सर्पदंशामुळे झाला. या प्रकरणी राजापूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा आरोग्य विभागाने उगारला आहेे. यामध्ये हलगर्जीपणा करणारे डॉ. दिलीप राठोड यांची बदली करण्यात आली आहे, तर डॉ. सचिन कुटे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच आरोग्य केंद्रातील हंगामी वाहनचालकाला कार्यमुक्त करण्याचा प्रस्ताव आरोग्य विभागाकडून देण्यात आला असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहेते यांनी सांगितले.

प्रगती वाघ ही घरी बारावीचा अभ्यास करीत असताना महाशिवरात्रीला शनिवारी (दि. १८) तिच्या पायाला तीन वेळा सर्पदंश झाला होता. ग्रामस्थांनीच प्रगतीला बेशुद्धावस्थेत खासगी दवाखान्यात नेले. तेथून प्रगतीला उपजिल्हा रुग्णालयात नेण्यास सांगितले. राजापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात ॲम्ब्युलन्ससाठी फोन केला असता वाहनचालक आजारी असल्याने ॲम्ब्युलन्स येऊ शकत नसल्याचे डॉ. सचिन कुटे यांनी कळविले. त्यामुळे नातेवाइकांनी प्रियंकाला ऑटोरिक्षाद्वारे येवला ग्रामीण रुग्णालयात हलविले हाेते.

उपचारात विलंब झाल्यानेच प्रगतीचा रस्त्यातच दुर्दैवी मृत्यू झाला, या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या सीईओ आशिमा मित्तल यांच्या आदेशानुसार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नेहेते यांनी या प्रकरणाची चौकशी करीत त्याचा अहवाल आणि कारवाईचा प्रस्ताव मागविला आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : वैद्यकीय अधिकाऱ्यांना भोवला हलगर्जीपणा ; एकाला 'कारणे दाखवा', तर एकाची... appeared first on पुढारी.