Site icon

नाशिक : वैद्यकीय बिल मंजुरीसाठी मागितले ‘पाच टक्के’, लाचखोर लिपिक गजाआड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
वैद्यकीय बिल मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात पाच टक्के लाचेची मागणी करणार्‍या जिल्हा शासकीय रुग्णालयातील वरिष्ठ लिपिकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले आहे. राजेश सुधाकर नेहुलकर असे या लिपिकाचे नाव आहे. न्यायालयाने त्यास एक दिवसाची कोठडी सुनावली आहे.

पोलिसांच्या आंतरजिल्हा बदल्यांसाठी बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र दिल्या प्रकरणी जिल्हा रुग्णालयातील तत्कालीन अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सकांसह कर्मचार्‍यांविरोधात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणाने रुग्णालयातील भ—ष्टाचार समोर आला आहे. त्याचप्रमाणे शासकीय अधिकारी-कर्मचार्‍यांना वैद्यकीय बिले देण्याच्या मोबदल्यात पाच ते दहा टक्के लाचेची मागणी होत असल्याच्या अनेक तक्रारी होत्या. जिल्हा रुग्णालयातील लाचखोरांची साखळी लाच घेतल्याशिवाय बिल मंजूर करत नसल्याची ओरड अनेकदा झाली आहे. त्यामुळे या कारवाईने या आरोपांना पुष्टी मिळाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, एका तक्रारदाराने त्याच्या पत्नीच्या आजारपणाचे दोन वैद्यकीय बिले मंजुरीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवली होती. ही बिले मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात राजेश नेहुलकर याने 10 ऑगस्ट 2022 रोजी बिलांच्या रकमेच्या पाच टक्केप्रमाणे 30 हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने तडजोड करून 24 हजार रुपये देण्याचे कबूल केले व याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. मात्र, नेहुलकर यास सापळ्याची भणक लागल्याने त्याने रजा टाकून लाचेची रक्कम स्वीकारण्यास टाळाटाळ केल्याचे सूत्रांनी सांगितले. अखेर दोन महिन्यांनंतर विभागाने नेहुलकर विरोधात लाचेची मागणी केल्याबद्दल गुन्हा दाखल करून त्यास अटक केली. नेहुलकर यास सोमवारी (दि.3) न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास एक दिवसाची कोठडी सुनावली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने नेहुलकर याची तक्रार रुग्णालयातील वरिष्ठांकडेही केली होती. मात्र, अधिकार्‍यांनी ठोस कारवाई केली नसल्याचे समजते. अखेर तक्रारदाराने मुंबईत तक्रार केल्यानंतर नेहुलकरविरोधात गुन्हा दाखल करून कारवाई केल्याची चर्चा आहे

याआधीही लाच घेतल्याने नगरमधून बदली
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने नेहुलकर याचे लाच मागतानाचे चित्रीकरण केले होते. त्यानंतर वरिष्ठांकडे तक्रारही केली होती. त्यामुळे कारवाईच्या भीतीपोटी नेहुलकरने वैद्यकीय रजा टाकल्याचे समजते. गेल्या आठवड्यातच तो पुन्हा सेवेत रुजू झाला होता. मात्र, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल करून त्यास अटक केली. अहमदनगर जिल्ह्यात कार्यरत असताना नेहुलकर यास लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर कारवाई म्हणून त्याची वेतनकपात करून नाशिक जिल्ह्यात बदली केल्याचे समोर आले आहे. .

हेही वाचा :

The post नाशिक : वैद्यकीय बिल मंजुरीसाठी मागितले ‘पाच टक्के’, लाचखोर लिपिक गजाआड appeared first on पुढारी.

Exit mobile version