नाशिक : व्यापारी बँकेच्या निवडणूक प्रक्रियेत गोंधळ घालणाऱ्यांविरोधात गुन्हा

नाशिकरोड-देवळाली व्यापारी सहकारी बँक www.pudhari.news

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
नाशिकरोड-देवळाली व्यापारी सहकारी बँकेच्या निवडणूक प्रक्रियेदरम्यान विभागीय सहउपनिबंधकांच्या कार्यालयात जबरदस्तीने शिरून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दमदाटी करणाऱ्यांविरोधात मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सहउपनिबंधक गौतम बलसाने यांच्या फिर्यादीवरून परिवर्तन पॅनलचे हेमंत गायकवाड यांच्यासह ३० जणांविरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बलसाने यांच्या फिर्यादीनुसार, गुरुवारी (दि.१) सारडा सर्कल येथील विभागीय उपनिबंधक सहकारी संस्थेत सहकारी बॅंकेची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया सुरू होती. अर्ज माघारीच्या वेळी ५५ उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याचा निषेध नोंदवत संशयित हेमंत गायकवाड, अशोक सातभाई, श्याम गोहाड, गंगाधर उगले, तानाजी गायधनी, विश्वास चौगुले, निवृत्ती अरिंगळे यांच्यासह इतर २५ ते ३० संशयितांनी गोंधळ घातला. संशयितांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कक्षात जबरदस्ती शिरून त्यांना शिवीगाळ करत कक्षातच कोंडले. तसेच महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग होईल, असे कृत्य केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे अधिकाऱ्यांच्या तोंडात नोटा काेंबण्याचा प्रयत्न केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून शासकीय कामात अडथळा आणला. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस तपास करीत आहेत.

हेही वाचा:

The post नाशिक : व्यापारी बँकेच्या निवडणूक प्रक्रियेत गोंधळ घालणाऱ्यांविरोधात गुन्हा appeared first on पुढारी.